समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचा ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचा ठिय्या
समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचा ठिय्या

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचा ठिय्या

sakal_logo
By

अलिबाग, ता. १६ (बातमीदार) ः आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रात रुग्णांना सेवा देणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यास सरकार उदासीन आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर १६० अधिकाऱ्यांनी सोमवारी आंदोलन केले. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या ‘काम बंद’ आंदोलनाचा फटका ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना बसला आहे.
महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष रूपेश सोनावळे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू असून यामध्ये डॉ. अनिकेत म्हात्रे, डॉ. महेश मोकल आदी असंख्य समुदाय आरोग्य अधिकारी सहभागी झाले आहेत.
जिल्हा परिषदेंतर्गत ५३ प्राथमिक आरोग्य केंद्र व २८८ आरोग्य उपकेंद्र आहेत. ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, रोगाचे निदान तातडीने व्हावे, यासाठी सरकारने आरोग्यवर्धिनी अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये राहणारे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व युवतींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपकेंद्रामध्ये बीएमएस दर्जाचे समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
जिल्ह्यातील २८८ उपकेंद्रांपैकी १६० उपकेंद्रांत समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत आरोग्यवर्धिनी अभियानातून सुमारे १३ प्रकारच्या आरोग्य सेवा दिल्या जातात. त्यात मधुमेह, स्तन, तोंडाचा व अन्य प्रकारच्या कर्करोग, उच्चरक्तदाब, प्रसूती सेवा, दंत व मुखरोगासंबंधी आरोग्य सेवा, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, नाक, कान, घसा व डोळे यासंबंधीच्या सामान्य आरोग्य सेवा, संसर्गजन्य रोग नियोजन राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, असंसर्गजन्य रोग तपासणी, प्रतिबंध नियंत्रण व नियोजन, नवजात अर्भक व नवजात शिशूंना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराची तपासणी करून त्यावर वेळीच उपचार, तसेच मार्गदर्शनही या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत केले जाते.
आरोग्यवर्धिनी अभियानातून उपकेंद्रामध्ये आरोग्य अधिकारी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास दिशा मिळाली आहे. गावे, वाड्या व डोंगराळ भागांमध्ये राहणाऱ्या रुग्णांना गावातल्या गावातच समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांमुळे उपचार मिळत आहे. मात्र याच समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या समस्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत आहे.

प्रमुख मागण्या
- समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सेवेत कायम करून गट ब अधिकाऱ्यांचा दर्जा मिळावा.
- केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ४० हजार मानधनावर वार्षिक वेतनवाढ व अनुभव बोनस मिळावा.
- समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत पती, पत्नी एकत्रीकरण, दुर्धर आजार, मानसिक आजारने ग्रस्त आई, वडील व बालके आदी कारणांसाठी धोरण निश्चित करणे.
- केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बढती देणे.