
मांज्यात अडकलेल्या कबुतरचा पक्षाप्रेमी पोलिसाने वाचविला जीव
नालासोपारा, ता. १६ (बातमीदार) : नायलॉन मांज्यात अडकलेल्या कबुतराचा पक्षीप्रेमी पोलिसाने जीव वाचविला आहे. किरण आव्हाड असे या पोलिस पक्षीप्रेमीचे नाव आहे. वसई पूर्वेतील एव्हरशाईन परिसरातील ही घटना आहे. रविवारी मोठ्या उत्साहात मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्यात आले आहेत. पतंग उडवताना तुटलेल्या नायलॉन मांज्यात कबुतर अडकून पडला होता. ही घटना पक्षीप्रेमी किरण यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कबुतरला पकडून कात्रीने मांज्या तोडून त्याला जीवदान दिले आहे.
वसई, विरार, नालासोपाऱ्यात मोठ्या उत्साहात मकर संक्रांतीचा सण साजरा झाला आहे. यानिमित्त लहानग्यांपासून वयोवृद्ध नागरिकांनी पतंग उडविण्याचा आनंद घेतला. पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरू नये, विक्री करू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. पण हौशी व्यापारी आणि खरेदी करणारे गिऱ्हाईक हे आपल्या आनंदापोटी नायलॉन मांजा वापरतात.
वसई पूर्वेतील एव्हरशाईन परिसरात पतंगाच्या तुटलेल्या मांज्यात एक कबुतर अडकले होते. त्याच्या संपूर्ण शरीराभोवती मांजा गुडळला गेला होता, यामुळे त्याला दुखापत झाली होती. ही बाब किरण आव्हाड या पक्षीप्रेमी पोलिसाच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी त्वरित कबुतरला पकडून कात्रीने मांजा तोडून त्याला जीवदान दिले. आपली संस्कृती आणि सणवार आनंदाने साजरा करावा, पण आपला आनंद पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या जीवावर बेतणार नाही याची काळजीही घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नालासोपाऱ्यात नायलॉन मांजा जप्त
तुळिंजचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नगरकर यांनी नालासोपारा परिसरात मोठी कारवाई करून, हजारो रुपयांच्या नायलॉन मांजाचे बंडल जप्त करत विक्रेत्यांवर कारवाई केली.