
गॅस शवदहिनीतून गॅस सिलेंडरची चोरी
भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम येथील स्मनाशभूमीत असलेल्या गॅस शवदाहिनीतून चक्क गॅस सिलिंडरची चोरी झाली आहे. विशेष म्हणजे हे सिलिंडर स्मशानातील कर्मचाऱ्यांकडूनच परस्पर बाहेर नेण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. याबाबत भाईंदर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
स्मशानभूमीत असलेल्या गॅस शवदाहिनीसाठी गॅस सिलिंडर पुरवठा करण्यासाठी महापालिकेने नवकार गॅस एजन्सीला कंत्राट दिले आहे. त्याचप्रमाणे या यंत्रणेची देखभाल-दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंत्राटदाराने यंत्रणा सुस्थितीत सुरू ठेवण्यासाठी, तसेच स्मशानभूमीत येणाऱ्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कर्मचारी ठेवले आहेत. शवदाहिनीतील गॅस संपल्यास कर्मचारीच गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्यास त्याची माहिती देऊन नवीन गॅस सिलिंडर मागवतात.
गेल्या काही काळापासून महापालिकेला येणाऱ्या गॅस पुरवठ्याच्या देयकामध्ये भरमसाठ वाढ झाली असल्याचे दिसून येत होते. एवढी वाढ अचानक का होत आहे, याची माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवली. त्यावेळी स्मशानातील बबन खुळे, राहुल खुळे व आणखी एक व्यक्ती स्मशानभूमीतील दोन गॅस सिलिंडर परस्पर रिक्षातून घेऊन जात असल्याचे आढळून आले. ही बाब गांभीर्याने घेत संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून पुढील योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे पत्र महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांनी भाईंदर पोलिस ठाण्याला दिले आहे.
चौकशीनंतर कारवाई
यासंदर्भात महापालिकेकडून आणखी तपशील मागविण्यात आले आहेत. त्यानंतर त्याची संपूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. बी. पाटील यांनी दिली.