
कोलाड परिसरात एकाच रात्री पाच घरे फोडली
रोहा, ता. १६ (बातमीदार) : कोलाड वरसगाव परिसरातील भीरा फाट्याजवळ असणाऱ्या हंस-प्रीत रेसिडेन्सीमधील पाच सदनिका फोडून घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या भागात एकाच रात्री पाच घरफोडीच्या घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोलाड वरसगाव परिसरातील संतोष संजय सानप, मंगेश मनोहर राजीवडे व अन्य तीन बंद घराच्या दरवाजांच्या कडी-कोयंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले १ लाख ७६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. या घटनेची माहिती समजताच कोलाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. याबाबत कोलाड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात चोरी व घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.