वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने ४८ लाखांचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने ४८ लाखांचा गंडा
वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने ४८ लाखांचा गंडा

वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने ४८ लाखांचा गंडा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एका दुकलीने चार विद्यार्थ्यांच्या पालकांकडून तब्बल ४८ लाख रुपये उकळून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. उमेंद्रकुमार सिंग व संदीप सिंग यांच्याविरोधात वाशी पोलिसांत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

वाशी रेल्वे स्थानकाजवळच्या हावरे इन्फोटेक पार्कमध्ये दुकलीने गाळा भाडेतत्त्वावर घेऊन त्या ठिकाणी मेरिल व्हेंचर्स नावाचे कार्यालय थाटले होते. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याबाबत जाहिरातबाजी सुरू केली होती. ठाणे येथे राहणारे रॉय परंबल हे त्यांच्या मुलीला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. याबाबतची माहिती दुकलीला मिळाल्यानंतर फोन करून त्यांच्या मुलीला प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले होते. त्यांना नोव्हेंबर महिन्यात प्रवेशाची ॲडव्हान्स बुकिंग रक्कम म्हणून तीन लाख रुपये, २० लाख रुपये डोनेशन, तसेच कॉलेजची प्रत्येक वर्षाची चार लाख ८४ हजाराची फी द्यावी लागेल असे सांगितले. रॉय यांनी पहिल्यांदा तीन लाख, त्यानंतर सांगलीतील इस्लामपूर येथे ९ डिसेंबर रोजी २० लाख रुपये दिले होते. त्यानंतर दोघांचे फोन बंद असल्याने रॉय यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेशाबाबत चौकशी केली असता,ते चालू नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वाशीतील कार्यालयात धाव घेतली असता ते बंद असल्याचे आढळून आले.

अन्य तिघांची फसवणूक
राजू जोसेफ दोडती यांच्याकडून २० लाख, प्रतिभा भोसले यांच्याकडून दोन लाख व चंद्रकांत मगदूम यांच्याकडून तीन लाखांची रक्कम प्रवेशाच्या नावाने उकळण्यात आल्याचे रॉय यांना समजले. त्यानंतर त्यांनी वाशी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.