
ऐन थंडीत बेघरांचे हाल
मुंबई, ता. १६ : थंडीत बेघरांवर कारवाई न करण्याचा राज्य सरकारचा नियम असतानाही दक्षिण मुंबईत बेघरांवर मुंबई पोलिसांकडून अमानुष पद्धतीने कारवाई केली जात आहे. चर्नी रोड येथील स. का. पाटील उद्यान पदपथ, ऑपेरा हाऊस, आझाद मैदान, लोकमान्य टिळक मार्ग, व्ही. पी. रोड, डी. बी. मार्ग, दवा बाजार या परिसरात पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे थंडीत बेघरांचे मोठे हाल होत आहे.
मुंबईत जवळपास ५० हजारांहून अधिक बेघर रस्ते, पदपथ, रेल्वे स्थानक, उड्डाणपूल, मोकळ्या जागांवर वास्तव्य करतात. त्यामध्ये वयोवृद्ध नागरिकांसह लहानग्यांचाही समावेश आहे. हे लोक वर्षानुवर्षे मुंबईत बेघर म्हणून राहत आहेत; मात्र गेल्या काही दिवसांपासून चर्नी रोड येथील स. का. पाटील उद्यान पदपथ, ऑपेरा हाऊस, आझाद मैदान, लोकमान्य टिळक मार्ग, व्ही. पी. रोड, डी. बी. मार्ग, दवा बाजार या परिसरात पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येत आहे. संध्याकाळी आणि रात्रीच्या अंधारात अचानक पोलिसांचा ताफा येतो. झोपलेल्या बेघरांना उठवून हाकलले जाते. विरोध करणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवला जातो. प्लास्टिक वा पुठ्ठ्याच्या मदतीने बांधण्यात आलेले तात्पुरते छप्परही पोलिसांकडून तोडले जाते. त्यांचे कपडे, अन्नधान्य, मुलांच्या शाळेची दप्तरेही जप्त करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे स. का. पाटील उद्यानाजवळ झालेल्या कारवाईत टँकरने पदपथावरील बेघरांवर पाणी ओतण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले.
---
गृहमंत्री-आयुक्तांकडे तक्रार!
मुंबई पोलिसांतर्फे गेल्या पाच दिवसांपासून दक्षिण मुंबईतील बेघर नागरिकांवर अमानुष पद्धतीने कारवाई केली जात आहे. मुंबईत १२५ रात्र निवारा केंद्र बांधण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही मुंबई पोलिस यंत्रणा बेघरांचे हाल करत आदेशांचे उल्लंघन करत आहे, असा आक्षेप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी नोंदवला. याप्रकरणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस आयुक्तांकडे तक्रार करत त्यांनी कारवाईची मागणी केली.