भिवंडीत स्वच्छता अभियानाचे तीनतेरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत स्वच्छता अभियानाचे तीनतेरा
भिवंडीत स्वच्छता अभियानाचे तीनतेरा

भिवंडीत स्वच्छता अभियानाचे तीनतेरा

sakal_logo
By

भिवंडी, ता. १७ (बातमीदार) : भिवंडी महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षाने आणि कालबाह्य स्‍वच्‍छतागृहामुळे शहरात स्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजले असून, नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. तसेच, मुख्य रस्त्यालगतच्या जीर्ण मुताऱ्यांमुळे शहराचे विद्रूपीकरण होऊ लागले आहे.
भिवंडी हे कामगारांचे शहर असल्याने नैसर्गिक विधीसाठी स्थानिक पालिका प्रशासनाने सुविधा निर्माण केल्या आहेत; पण त्याच्‍या दुरुस्तीकडे स्वच्छता विभाग आणि बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने शहरातील अनेक मुताऱ्यांमध्ये व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सार्वजनिक मुताऱ्यांची स्वच्छता नियमित करीत नाही; तर सुलभ शौचालयाचे व्यवस्थापन नियमितपणे होत नसून, जंतुनाशकाची फवारणी केली जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.
शहराच्या मुख्य मार्गावर आणि पदपथावर बनविलेल्या मुताऱ्यांमुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. कल्याण रोडवर पॉवर हाऊसच्या बाहेर चुकीच्या रीतीने फायबर बॉक्सची मुतारी बनविण्यात आली. हा बॉक्स पदपथावर ठेवल्याने नागरिकांना आणि रस्त्यालादेखील अडथळा निर्माण झाला. नियमितपणे साफसफाई न झाल्याने अखेर या मुतारीची दुर्दशा झाली. मुतारीवरील छप्पर नाहीसे झाले आहे. दरवाजे तुटल्याने या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेचे स्वच्छता विभाग आणि बांधकाम विभागाचे अधिकारी आणि अभियंता यांनी या दुरवस्‍थेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक आणि पादचाऱ्यांकडून होत आहे.
----------------------
भिवंडी-कल्याण रोड या मार्गावर पॉवर हाऊसच्या भिंतीला लागून असलेले फायबरचे मुतारी आणि शौचालय आग लागल्याने त्याच जागेवर आहे. आजूबाजूस सुविधा उपलब्‍ध झाल्याने त्यास दुरुस्तीचा प्रस्ताव नाही. हा फायबरचा मुतारीचा बॉक्स लवकरच दूर केला जाईल.
- नितीन चव्हाण, शौचालय विभागप्रमुख, भिवंडी महानगरपालिका