ज्वेलर्स दुकानातील चोरीप्रकरणी आरोपीस अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्वेलर्स दुकानातील चोरीप्रकरणी आरोपीस अटक
ज्वेलर्स दुकानातील चोरीप्रकरणी आरोपीस अटक

ज्वेलर्स दुकानातील चोरीप्रकरणी आरोपीस अटक

sakal_logo
By

अंधेरी, ता. १७ (बातमीदार) ः बोरिवलीतील महाराणा ज्वेलर्समध्ये झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील एका आरोपीस गुन्हे शाखेच्या दहिसर युनिटच्या अधिकाऱ्यां‍नी रविवारी (ता. १५) अटक केली. शाहिद ऊर्फ शाहिद रजाऊल शेख ऊर्फ बंगाली असे या आरोपीचे नाव असून त्याचा दुसरा सहकारी फरार आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या दोघांनी ज्वेलर्स दुकानातून सुमारे ४० लाख रुपयांचे चांदीचे दागिने पळवल्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले. अटकेनंतर शाहिदला किल्ला कोर्टाने २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सुनील शांताराम जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांचे बोरिवली परिसरात महाराणा ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. जुलै महिन्यात या दुकानातील शटरचे लॉक तोडून दोन अज्ञात तरुणांनी आत प्रवेश केला होता. त्यानंतर दुकानातील सुमारे ४० लाख रुपयांचे चांदीचे दागिने आणि कॅश घेऊन पलायन केले होते. दुसऱ्या‍ दिवशी हा प्रकार उघडकीस येताच सुनील जैन यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंद होताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासादरम्यान या गुन्ह्यात शाहिदसह त्याच्या एका सहकाऱ्याचा सहभाग उघडकीस आला होता. ते दोघेही घरफोडीनंतर कोलकाता येथे पळून गेले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी प्रभारी पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या पथकातील प्रकाश सावंत, बागवे, गोमे, अल्ताफ खान यांना कोलकाता येथे पाठवण्यात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या शाहिदला हुबळी येथून शिताफीने अटक केली. चौकशीत त्याचा या गुन्ह्यात सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यात तो सध्या पोलिस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.