
डहाणूत आचारसंहितेमुळे विकासकामे ठप्प
डहाणू, ता. १७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात कोकण शिक्षक मतदारसंघात ३० जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विविध विभागांमार्फत मंजूर झालेली विकासकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे गावागावांचा विकास खुंटला असून आदिवासी मजूरवर्गावर स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे.
पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांत ३० जानेवारी कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता २९ डिसेंबर २०२२ पासून लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीत २१ हजार शिक्षक मतदार मतदान करणार आहेत. आदर्श आचारसंहितेप्रमाणे मतदारांवर प्रभाव पाडणारी कोणतीही घोषणा, आमिषे किंवा प्रलोभने दाखवू नये, असे गृहीत धरलेले असते.
दोन वर्षांचा कोरोनाकाळ संपताच सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद, कृषी खाते, वनखात्यामार्फत केली जाणारी विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. काही कामे सुरूही करण्यात आली आहेत; मात्र खूप मोठ्या प्रमाणावर मंजूर असलेल्या विकासकामांसाठी त्यांच्या निविदा काढणे, कार्यारंभ आदेश देणे आणि त्यांच्या प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे ही कामे मात्र आचारसंहिता महिन्याभरापासून लागू असल्याने खोळंबून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे गावागावातील रस्ते, पुले, बंधारे, शाळा इमारती, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे अशी विविध विकासकामे खोळंबून ठप्प झाली आहेत. त्यामुळे मोलमजुरीवर अवलंबून असणारा आदिवासीवर्ग मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होत आहे.