धरणांतील साठ्यात २५ टक्‍के घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धरणांतील साठ्यात २५ टक्‍के घट
धरणांतील साठ्यात २५ टक्‍के घट

धरणांतील साठ्यात २५ टक्‍के घट

sakal_logo
By

प्रमोद जाधव ः सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १८ ः जिल्ह्यातील शेकडो गावांना परिसरातील लहान-मोठ्या धरणांद्वारे पाणीपुरवठा केला जातो; परंतु जानेवारी महिन्यातच धरणांतील २५ टक्के साठा कमी झाला आहे. त्‍यामुळे उन्हाळा संपेपर्यंत पाण्याचे नियोजन कसे करावे, असा प्रश्‍न प्रशासनासमोर आहे. काही तालुक्‍यांत आतापासूनच पाणीटंचाईचे संकट ओढावल्‍याने आठवड्यातून एक दिवस कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणांमधील पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात नसल्याने भविष्‍यात रायगडकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत २८ धरणे आहेत. त्यात सुधागड तालुक्यात पाच, श्रीवर्धनमध्ये तीन, म्हसळ्यात दोन, महाड-चार, खालापूर- तीन, पनवेल- तीन, कर्जत- दोन, उरण, मुरूड, तळा, रोहा, पेण व अलिबाग या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक धरण आहेत. या धरणांमधून पेण नगरपरिषद, महाड शहरासह लगतची १९ गावे, श्रीवर्धन नगर परिषद क्षेत्रासह १३ गावे, दुंदरेपाडा, चिंचवली, मोर्बे, आडगाव, आपटी, होराळे, जांभिवली, नंदनपाडा, नारंगी, सावरोली, शिरवली, तांबाटी, डोणवत, गोरठण, तांबाटी, खिरकंडी, ठाकुरवाडी, निगडोल, नडोदे, कलोते, वावर्ले वावंढळ, श्रीगांव, कुर्डूस, कुसुंबळे, पोयनाड, पाभरे, तोंडसुरे, संदेरी, आंबेत, फळसप, बोर्ली, मांडला, भोईघर, काकळघर, काशिद, वैतागवाडी, सोनसडे, भानंगकोंड, कलमशेत, मांदाड, वनास्ते, शेणवली, कार्ले, दिवेआगर, बोर्ली, पंचतन, भरखोल, रानवली, निगडी, गालसुरे, बापवन अशा एकूण ७८ गावांना पाणीपुरवठा होतो.
जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडला. त्‍यामुळे बहुतांश धरणे तुडुंब भरली; मात्र वाढत्या औद्योगिकीरणासह, नागरीकरणामुळे पाण्याचा वापर प्रचंड वाढला आहे. त्‍यात तापमानाचा पारा वाढताच धरणातील साठ्यात घट होत आहे. त्‍यामुळे लघु पाटबंधारे विभागाने काही गावांमध्ये एकतर काही गावांमध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.
पावसाळ्यापर्यंत धरणातील साठा शिल्लक राहावा, यासाठी कोलाड येथील लघु पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू केले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले, रानवली, उरण तालुक्यातील पुनाडे धरणांमध्ये केवळ ३३ ते ५८ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे; तर मुरूड तालुक्यातील फणसाड, अलिबाग तालुक्यातील श्रीगाव, सुधाडगडमधील कवेळ, कोंडगाव, खालापूरमधील भिलवले, कर्जतमधील अवसरे, साळोख, खैरे, महाडमधील वरंध, श्रीवर्धनमधील कुडकी या धरणांमध्ये ६६ ते ८० टक्के साठा शिल्लक आहे. जूनपर्यंत पाणीसाठा राहावा, यासाठी अनेक गावांना आतापासूनच नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यातील पाणीसाठा
धरण - साठा टक्केवारी
फणसाड - ६७
वावा - ८३
सुतारवाडी - ९३
आंबेघर - ८७
श्रीगांव - ७२
कोंडगाव - ८०
घोटवडे - ८७
ढोकशेत - ८२
कवेळ - ७४
उन्हेरे - ८७
कार्ले - ५८
कुडकी - ७४
रानिवली - ३३
पाभरे - ९६
संदेरी - ९४
वरंध - ७७
खिंडवाडी - ८२
कोथुर्डे - ८२
खैरे - ७२
साळोख - ७०
अवसरे - ६६
भिलवले - ८०
कलोते मोकाशी - ८३
डोणवत - ६६
मोरबे - ८५
बामणोली - ८६
उसरण - ९१
पुनाडे - ५८

पाणी जपून वापरण्याचे आवाहन
धरणांमधील जलसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. काही गावांमध्ये पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. जून महिन्यात पाऊस सुरू होईपर्यंत धरणांत किमान साठा शिल्लक राहावा, यासाठी नियोजन केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागाने केले आहे.