
कोसळलेल्या पुलाच्या जागी नवा पूल उभा करण्यासाठी पावणेदोन कोटी रुपयांचा मुलामा
वज्रेश्वरी, ता. १७ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पिळंझे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या भवरपाडा ते नंबर पाडा दरम्यानचा पूल सुमारे चार वर्षांपूर्वी कोसळला. त्यानंतर काही काळातच तेथील जोडरस्ता वाहून गेला. त्यामुळे याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल एक कोटी ७२ लाख रुपये खर्चून नवा पूल उभारला. त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पिळंझे ही आदिवासी विकास क्षेत्र (पेसा) अंतर्गत येणारी ग्रुप ग्रामपंचायत असून यामध्ये पिळंझे बु, पिळंझे ब, देपोली, साखरोली या महसुली गावांसह सुमारे १६ आदिवासी पाडे आहेत. या ठिकाणी भवरपाडा ते नंबरपाडा दरम्यान ओहोळ असून, त्यावर बांधलेला पूल २०१८ मध्ये कोसळला होता. त्यानंतरच्या काळात या पुलाचा जोडरस्ता वाहून गेला. या ठिकाणी पूल व जोडरस्ता तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा मागविण्यात आली. यामध्ये विवेक पवार यांना एक कोटी ६८ लाख ६४ हजार ९३१ रुपयांची निविदा मंजूर करून काम सोपविण्यात आले. या पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, बांधकाम काँक्रीट कामासाठी रेतीऐवजी चक्क फेकून देण्यालायक असलेली स्टोन ग्रीड पावडर वापरण्यात आली असल्याचा आरोप सरपंच संतोषी विनोद अघडा यांनी केला आहे.
-------------------------------------------
ठेकेदाराची मनमानी
वास्तविक पाहता दोन वेळा सरकारच्या कोट्यवधी रुपयांची माती झाली असताना पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. त्यावर लक्ष ठेवण्याची गरज सार्वजनिक बांधकाम विभागास वाटली नाही का, हा प्रश्न आहे. या पुलाचे बांधकाम तकलादू असून सुरुवातीपासूनच बांधकाम विभाग याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. जोडरस्त्याच्या कामात काँक्रीट भिंत उभारण्याचे नमूद असताना तेथे दगडाचा वापर ठेकेदाराने केला. याबाबत आवाज उठविल्यानंतर ठेकेदाराने ती भिंत तोडून नवी संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू केल्याची माहिती उपसरपंच किशोर पाटील यांनी दिली.
-------------------------------