
मिरा-भाईंदरमध्ये आठ वासरांना लम्पीची लागण
भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : मिरा भाईंदरमध्ये गायीच्या आठ वासरांना लम्पी या चर्मरोगाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे शहरातील सर्व जनावरांचे लम्पीचे लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतरही त्यांना या आजाराची लागण झाली आहे. याची गंभीर दखल घेत शहरातील सर्व जनावरांना रस्त्यावर मोकाट सोडण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश महापालिकेकडून जारी करण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.
राज्यात लम्पीची लाट आली असताना मिरा-भाईंदर शहरात एकाही जनावरला लम्पीची लागण झाली नव्हती. खबरदारीची उपाययोजना म्हणून महापालिकेने शहरातील सर्व जनावरांचे सर्वेक्षण करून त्यांचे शंभर टक्के लसीकरण केले होते; मात्र त्यानंतरही गायीच्या आठ वासरांना लम्पीची लागण झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. या सर्व वासरांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून उपचार सुरू असून त्यांचा आजार नियंत्रणात आहे, अशी माहिती महापालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विक्रम निराटले यांनी दिली.
लम्पी हा झपाट्याने पसरणारा संसर्गजन्य आजार असल्यामुळे महापालिकेने ही बाब गांभीर्याने घेत शहरातील गोशाळा व जनावरे बाळगणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार शहरातील गोपालक, पशुपालक, दुग्ध व्यावसायिक, गोरक्षण संस्था यांनी ज्या ठिकाणी जनावरे पाळली आहेत. त्या ठिकाणापासून ती अन्य कोणत्याही ठिकाणी नेता येणार नाहीत. तसेच जनावरांना मोकाट सोडता येणार नाही, गुरांचा आणि म्हशींचा बाजार भरवणे, त्यांची शर्यत लावणे, त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम करणे याला सक्त मनाई करण्यात आली आहे. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अन्यथा प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त दिलीप ढोले यांनी दिला आहे.