
चार दिवसांत ३८९ पक्ष्यांना जीवदान
कांदिवली, ता. १७ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील शंकर मंदिर मार्गावर असलेल्या सेव्ह बर्डस् सेवा केंद्राने मकर संक्रांतीच्या तीनचार दिवसांत पतंगाच्या मांजामुळे जखमी झालेल्या ३७९ पक्ष्यांना जीवदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सेव्ह बर्डस् या सेवा केंद्रात जवळपास ७० ते ८० स्वयंसेवक महाविद्यालयीन विद्यार्थी, पक्षीमित्र जखमी पक्ष्यांना बास्केट किंवा कागदी बॉक्समधून सेवा केंद्रात घेऊन येतात. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत येथे जखमी पक्ष्यांवर उपलब्ध डॉक्टर तातडीने उपचार करतात. डॉक्टरांनी सांगितले, की पतंगाचा मांजा पंखात आणि पायात अडकून जास्त पक्षी जखमी होतात. अशा पक्ष्यांवर योग्य औषधोपचार करून टाके मारले जातात. २४ तास खाण्यापिण्याची व्यवस्था करून निरीक्षण केले जाते. बरे झालेले पक्षी पुन्हा निसर्गात मुक्त केले जातात.
चार दिवसांत जीवदान मिळालेले पक्षी
३५० कबूतर
७ बगळे
२ घुबड
२ घार
१८ कावळे
१० इतर पक्षी
१५ वर्षांपासून कार्य
गेली १५ वर्षे सेव्ह बर्डस् संक्रांतीच्या दिवसांत जखमी पक्ष्यांवर उपचार करून त्यांना जीवदान देत आहेत. सेव्ह बर्डस् संस्थेचा मदतकार्य फोन नंबर संस्था मंडळे, समाजसेवकांकडे असल्याने, तातडीने माहिती मिळाल्याने पक्ष्यांचे जीव वाचवण्यात यश मिळते, असे संस्थेने सांगितले आहे.