शिळफाटा ते माळशेज राष्ट्रीय महामार्गाची चाचपणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिळफाटा ते माळशेज राष्ट्रीय महामार्गाची चाचपणी
शिळफाटा ते माळशेज राष्ट्रीय महामार्गाची चाचपणी

शिळफाटा ते माळशेज राष्ट्रीय महामार्गाची चाचपणी

sakal_logo
By

टिटवाळा, ता. १७ (बातमीदार) : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाहतुकीच्या दृष्टीने शिळफाटा ते काटई बदलापूर मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा मार्ग अंबरनाथ तालुक्यातील बोराडपाडा येथून मुरबाडच्या म्हसा, धसई यांना जोडून थेट माळशेज घाटापर्यंत नेण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा, या मागणीची व्यवहार्यता तपासण्याच्या सूचना मंत्रालयाने दिल्या आहेत. या प्रस्तावित रस्त्यामुळे कल्याण-नगर आणि काटई-कर्जत या महामार्गांव्यतिरिक्त एक नवा मार्ग परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.

सध्या ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि नवी मुंबईकरांना कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर येण्यासाठी कल्याण आणि डोंबिवली शहरातून जावे लागते. काटई-कर्जत मार्गानेही माळशेज घाटापर्यंत पोहचण्यासाठी बराच वेळ आणि इंधन खर्ची पडते. त्यामुळे शिळफाटा ते काटई आणि पुढे नेवाळी नाका-बदलापूर-बोराडपाडा-म्हसा-धसईमार्गे थेट माळशेज घाटाला जोडावा, अस्तित्वातील या राज्य मार्गाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जा वाढवावा, अशी मागणी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाकडे केली होती. त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत मंत्रालयाने या नव्या रस्त्यास राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जोन्नती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे नमूद केले आहे. त्यासाठी रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार बी. डी. ठेंग यांनी संबंधित विभागाला व्यवहार्यता तपासण्याचे आदेश दिले आहेत.


अनेक उपाय योजूनही शीळफाट्याला होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप कायम आहे. उलट या मार्गाने प्रवास करताना अन्य काही ठिकाणीही वाहतूक कोंडी होऊ लागल्याचे दिसून येऊ लागले आहे. कल्याण-शिळ मार्गावर लोढा वसाहतीजवळ वाहतूक कोंडी होते. तसेच काटई-कर्जत रस्त्यावरील नेवाळी नाका इथेही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. नव्या राष्ट्रीय मार्गामुळे महामुंबईतून पुणे तसेच नगर जिल्ह्यात कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे.