
खडीं ते शिर्डी पदयात्रेला उत्साहात सुरुवात
खर्डी, ता. १९ (बातमीदार) : खर्डीतील साई श्रद्धा मित्र मंडळाच्या वतीने साईभक्तांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. खर्डीत शांतता राहण्यासाठी व सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये एकोपा राहावा, यासाठी खर्डी ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष महेश निकम व ताराचंद मराडे यांनी सांगितले. या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका विस्तारक गणेश राऊत, माजी जि. प. सदस्य विठ्ठल भगत, उपतालुकाप्रमुख किशोर शेलवले, अनिल मडके, प्रशांत खर्डीकर राष्ट्रवादीचे युवा उपजिल्हाध्यक्ष श्रेयस वेखंडे, दिनेश सदगीर यांच्यासह महिलांनी पदयात्रेत पालखी घेऊन साईभक्तांना शुभेच्छा दिल्या. पदयात्रेच्या दिवशी संपूर्ण खर्डी गाव परिसरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद चालक-मालक संघटनेतर्फे साई भक्तांना अल्पोपाहार देण्यात आला. या पदयात्रेत परिसरातील २४० साई भक्तांनी सहभाग घेतला. खर्डी येथील साई मंदिरात २३ जानेवारीला साईबाबांच्या नवीन मूर्तीची स्थापना करण्यात येणार असून, २६ रोजी साई मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन साईश्रद्धा मंडळाचे उपाध्यक्ष अनिल पातकर व अशोक जाधव यांनी केले आहे.