
शाळांमध्ये नशामुक्ती अभियान राबवा
वसई, ता. १८ (बातमीदार) : नव्याने तुळिंज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून रुजू झालेले शैलेंद्र नगरकर यांची भेट घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी नालासोपारा शहरातील समस्यांबाबत माहिती दिली. यावेळी शाळांमध्ये नशामुक्ती आणि विद्यार्थिनींना आत्मरक्षणाचे धडे देणारे अभियान राबवा, अशी मागणी देखील करण्यात आली.
मनसेचे नालासोपारा शहर सचिव राज नागरे यांनी नव्याने पदभार स्वीकारलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे स्वागत केले. याप्रसंगी नालासोपारा शहरातील अनधिकृत नायजेरियन, बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य, अवैध फेरीवाले, रिक्षावाले आणि बेकायदा पार्किंग यावर आळा घालण्यात यावा; तसेच पानटपरीवर गुटखा, नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच शहरात नशामुक्ती अभियान, शालेय विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षण, तसेच महिला कायद्याबाबत महिला पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शाळेत अभियान राबविण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली. यावेळी नालासोपारा शहर सचिव राज नागरे, किशोर कारेकर, महिला उपजिल्हाध्यक्ष श्रद्धा राणे, कला नायर, समाजसेविका अर्चना नलावडे, गोपाळ वांद्रे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------
वसई : नालासोपारा शहरातील समस्या मांडत मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्याकडे शाळांमध्ये नशामुक्ती अभियान राबवण्याची मागणी केली.