
अबोलीने दिला रस्ता सुरक्षेचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ३३ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोपाच्या निमित्ताने ठाण्यातील अबोली रिक्षा, दुचाकी तसेच ठाण्यातील मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलच्या चारचाकी वाहनांची रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन मराठी सिने व मालिकांमधील अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्ता सुरक्षेचे महत्त्व कळावे, यासाठी ही रॅली काढण्यात आली. या वेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके, प्रसाद नलवडे, अशोक खेनट, गणेश पाटील, लेखाधिकारी अपर्णा पाटणे, ठाणे आरटीओ कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. लुईसवाडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय (नवीन आरटीओ) येथून रॅलीस सुरुवात झाली.
या रॅलीत सुमारे ५० दुचाकी, ३० अबोली ऑटोरिक्षा, ठाण्यातील मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलची २५ चारचाकी वाहने यांनी सहभाग नोंदविला. रॅली लुईसवाडी येथून नितीन कंपनी-कॅडबरी कंपनी-पोखरण रोड नंबर-१-उपवन तलाव-टिकुजिनी वाडी रोड, मानपाडा- माजिवडा मार्गे पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालय लुईसवाडी येथे रॅलीची सांगता करण्यात आली. सर्वांनी रस्ता सुरक्षाविषयक नियमांचे पालन करून अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी केले.
अबोली रिक्षाचालक महिलांचे कौतुक
महिलांना सुरक्षितपणे प्रवास करण्याची हमी देणाऱ्या आणि त्यासाठी ऑटो रिक्षाचे सारथ्य करणाऱ्या उपस्थित अबोली रिक्षा चालक महिलांचे त्यांनी या वेळी कौतुक केले. रस्ता सुरक्षा जनजागृतीबाबत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करून सर्वांना सुरक्षित नवीन वर्षाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी रॅलीत सहभागी झालेल्या, दुचाकीचालक, अबोली महिला रिक्षाचालक, मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलचे मालक, प्रतिनिधी यांचे आभार व्यक्त करून रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३ ची सांगता झाल्याचे जाहीर केले.