
भात विक्रीवर शेतकऱ्यांना वाढीव बोनस द्या
मुरबाड, ता. १८ (बातमीदार) : शासनाने शेतकऱ्यांच्या भाताला प्रतिक्विंटल ३७५ रुपये बोनस जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे किमान एक हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भाताला बोनस जाहीर करावा, अशी मागणी माजी आमदार गोटिराम पवार यांनी केली आहे.
एक हेक्टर क्षेत्रावर चाळीस क्विंटल भात पिकते, असा हिशेब गृहीत धरून शासनाने हेक्टरी पंधरा हजार रुपये अनुदान जाहीर केले. म्हणजेच ४० क्विंटल भातासाठी १५ हजार रुपये बोनस मिळणार आहे. याचा अर्थ एक क्विंटलसाठी फक्त ३७५ रुपये मिळणार आहेत. कोकणात अधिकतर शेती एकपिकी आहे. शेतकऱ्यांना एक हेक्टर क्षेत्रावर भात लागवड व मशागत करण्यासाठी येणारा खर्च विचारात घेऊन शासनाने भातासाठी किमान एक हजार रुपये प्रतिगुंठा अनुदान देणे गरजेचे होते; पण ते न देता शासनाने तुटपुंजी रक्कम जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. तीन वर्षांपूर्वी ७०० रुपये क्विंटल बोनस दिला होता. त्यामुळे आता बोनसमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार गोटिराम पवार यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.