
पालघरमध्ये गरजूंना ब्लॅंकेटचे वाटप
मनोर, ता. १९ (बातमीदार) : असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटच्या वतीने मंगळवारी पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील दुर्गम भाग असलेल्या जायशेत बहिरी फोंडा ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूर पाड्यामध्ये ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. डॉ. राजेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शंभर गरजू ग्रामस्थांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. गेल्या आठवड्याभरापासून तालुक्यात थंडीची लाट आली आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने दुर्गम भागातील ग्रामस्थांना थंडीपासून बचाव करण्यासाठी हिवाळी कपडे खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा गरजूंना ब्लॅंकेटचे वाटप केल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. तसेच यावेळी दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ३१ कुपोषित बालकांची तपासणी करून औषधे देण्यात आली. कुपोषित बालके आणि त्यांच्या मातांना गूळ, शेंगदाणे, खोबरे आणि डाळीचे वाटप करण्यात आले.