एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक
एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक

एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याची थाप मारून लाखो रुपये उकळणाऱ्या पाच जणांच्या आंतरराज्य टोळीला नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने देशभरातील अनेक गरजू विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचे तपासात आढळून आले आहे. या टोळीने मुंबई, नवी मुंबई, रायगड, भंडारा या भागात केलेले फसवणुकीचे ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. अशाच प्रकारचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केली.

सौरभ कृष्णा उपाध्याय (वय ३९), इफ्तेखार अहमद मुस्ताक अहमद ऊर्फ अभय सिंग ऊर्फ गौतम (वय ३१), लव अवधकिशोर गुफ्ता (वय ३५), आकिब नौशाद अहमद (वय २८) आणि अभिजात्य राधेशाम सिंग (वय ४१) अशी आरोपींची नावे आहेत. या टोळीने काही महिन्यांपूर्वी खोटे नाव धारण करून छत्तीसगड येथील विनोदनी यादव यांच्या मुलीला नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले होते. या नावावर त्यांच्याकडून ३३ लाख ५० हजार रुपये उकळले होते.

नेरूळ पोलिस ठाण्यात या टोळीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर परिमंडळ - १ चे पोलिस उप आयुक्त विवेक पानसरे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत व गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन ढगे व सत्यवान बिले यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या मदतीने या गुन्ह्यातील आरोपींबाबत माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना वाशी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून अटक केली. या टोळीने आतापर्यंत मुंबईतील ग्रॅंट वैद्यकीय महाविद्यालय (सर जेजे), सायन वैद्यकीय महाविद्यालय, नायर वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, तेरणा वैद्यकीय महाविद्यालय, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय या नामांकित महाविद्यालयांसह इतर काही महाविद्यालयांत प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने ३ कोटी ३० लाखांची रक्कम उकळल्याचे तपासात आढळून आल्याची माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.