
नवाब मलिकांच्या मुलावर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फराजविरुद्ध कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फराज मलिक याची दुसरी पत्नी हॅमलिन फ्रान्सची नागरिक आहे. तिच्या व्हिसासाठी फराजने बनावट कागदपत्रे तयार केल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. फराज मलिक आणि हॅमलिन यांनी टुरिस्ट व्हिसाचे एंट्री-एक्स १ व्हिसामध्ये रूपांतर करण्यासाठी लग्नाची बनावट कागदपत्रे तयार केली होती. त्यानुसार दोघांविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ मार्च २०२२ ते २३ जून २०२२ दरम्यान कुर्ल्यात बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. विशेष शाखेच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून कुर्ला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, फराज आणि हॅमलिनव्यतिरिक्त पोलिसांनी आणखी काही जणांवरही गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.