कचरा टाकण्याच्या जागेवर सुशोभीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा टाकण्याच्या जागेवर सुशोभीकरण
कचरा टाकण्याच्या जागेवर सुशोभीकरण

कचरा टाकण्याच्या जागेवर सुशोभीकरण

sakal_logo
By

विरार, ता. २३ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेतर्फे सध्या शहारत विविध पद्धतीने शहराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. डिसेंबर महिन्यापासून सुरू केलेल्या शहरातील या सुशोभीकरणाच्या कामामुळे सध्या शहरातील विविध ठिकाणांना नव्याने झळाळी मिळाली आहे. यामध्ये पालिकेने नागरिकांमार्फत कचरा टाकण्यात येणारी अशी ५४ ठिकाणे पालिकेने शोधली होती. त्यापैकी पालिकेने २४ ठिकाणे सुशोभित केली आहेत.
सरकारने राज्यस्तरीय शहर सुशोभीकरण आणि शहर स्वच्छता २०२२ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत पालिकेनेदेखील सहभाग नोंदवला असून शहराचे सुशोभीकरण आणि शहर स्वच्छता यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत; मात्र याव्यतिरिक्त पालिकेने कचरा व्यवस्थापनावरदेखील भर दिला आहे. यामध्ये ओला, कचरा सुका कचरा वर्गीकरण करणे बंधनकारक केले आहेच; तर दुसरीकडे शहरातील मुख्य रस्त्यांवर दिसून येणाऱ्या म्हणजेच नागरिकांतर्फे उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यावर उपाययोजना त्या भागाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे शहरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेला कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
महापालिकेने आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यात येणारी ५४ ठिकाणे शोधून काढली आहेत. यातील २४ जागांची स्वच्छता करून त्याला सुशोभित करण्यात आले आहे. त्या जागी छोटेखानी बैठक व्यवस्था अन्यथा छोटे शिल्प उभारण्यात आले आहे; तर उर्वरित ठिकाणी सुशोभीकरण करण्याचे काम पालिकेतर्फे सुरू आहे. यासह पालिकेने शहरातील चौकदेखील नव्याने तयार करण्याचे ठरवले होते. दुरवस्था झालेल्या आणि नव्याने तयार करण्यासाठीच्या अशा चौकांचे सर्वेक्षण करून पालिकेने एकूण सहा ठिकाणी कारंजे बसवले आहेत; तर १४ चौकांचे सुशोभीकरण करून त्याला नवीन झळाळी दिली आहे. यासह शहरातील भिंती रंगवणे, त्यावर विविध संदेश, चित्रे काढण्यात आली असल्याचे पालिकेने सांगितले.