
डोंबिवलीत ‘सोलार रुफ टॉप’च्या जनजागृतीसाठी रॅली
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : घरगुती ग्राहकांच्या वीजबिलात बचत व पर्यावरण संरक्षणात महत्त्वपूर्ण अशा केंद्र सरकार पुरस्कृत ‘सोलार रुफ टॉप’ योजनेच्या जनजागृतीसाठी महावितरणच्या डोंबिवली विभागाकडून बाईक रॅली काढण्यात आली होती. योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सवलतीच्या दरात सौरऊर्जा प्रकल्प उभारणीबाबत माहिती देऊन अधिकाधिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन रॅलीमार्फत करण्यात आले.
मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर डोंबिवली विभाग कार्यालयातून रॅलीची सुरुवात झाली. घरडा सर्कल, टिळक चौक, चार रस्ता, कोपर पूल, द्वारका हॉटेल, सम्राट चौक यामार्गे जात रेतीबंदर येथील आनंदनगर उपकेंद्रात रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत डोंबिवली विभागातील सर्व महिला व पुरुष अभियंते, तांत्रिक कर्मचारी, जनमित्र असे सुमारे २०० जण सहभागी झाले होते. डोंबिवली विभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंते प्रमोद पाटील, गजानन पाटील, विनायक बुधवंत, पराग उके, सुगत लबडे यांनी रॅलीसाठी परिश्रम घेतले; तर रॅलीमुळे नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी वाहतूक पोलिस लक्ष ठेवून होते.
अनुदानाची तरतूद
केंद्र सरकारकडून योजनेंतर्गत घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॉट क्षमतेची छतावरील सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी अनुदान देण्यात येते. यात घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॉटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलो वॉटपेक्षा अधिक ते १० किलोवॉटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येते. तसेच सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॉटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदानाची तरतूद आहे.