बाळगंगा धरणाचे काम वेगात, विस्‍तापित कोमात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळगंगा धरणाचे काम वेगात, विस्‍तापित कोमात
बाळगंगा धरणाचे काम वेगात, विस्‍तापित कोमात

बाळगंगा धरणाचे काम वेगात, विस्‍तापित कोमात

sakal_logo
By

धरणाची रखडपट्टी

पेण, ता. १९ (वार्ताहर) : तालुक्यात होत असलेल्या बाळगंगा धरणाचे काम १३ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. सध्या धरणाचे काम वेगाने सुरू असले तरी धरणामुळे झालेल्या विस्‍थापित मात्र अद्याप सोयी-सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत.
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पेण तालुक्यातील पूर्व विभागामधील जावळी, वरसई खोऱ्‍‌यात बाळगंगा धरणाची निर्मिती करण्यात येत असून जवळपास ८० ते ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे; परंतु गेल्‍या काही वर्षांपासून धरणाचे काम संथगतीने होत आहे. पुनर्वसन न झाल्‍याने धरणग्रस्‍तांनाही अनेक समस्‍यांना तोंड द्यावे लागत आहे. शिवाय कामाचीही रखडपट्टी सुरू असल्‍याने धरणग्रस्‍तांच्या व्यथा ऐकणार कोण, असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे.
पुनर्वसित गावांत रस्ते व इतर नागरी सुविधा तत्काळ देण्यात याव्यात, याकरिता बाळगंगा धरण संघर्ष व पुनर्वसन समितीच्या माध्यमातून अनेकदा सरकारदरबारी मागणी केली आहे, मात्र वारंवार दुर्लक्ष होत असल्‍याचे ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे.
मध्यंतरी पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार आणि लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता धनश्री राजभोज यांनी धरणग्रस्तांच्या समस्‍या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता.
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात धरणाच्या कामाबरोबरच स्‍थानिकांच्या सोयी-सुविधा, तसेच पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा धरणग्रस्‍तांना होती. मात्र अधिवेशनात केवळ बाळगंगा धरणाचाच प्रश्न उपस्थित करण्यात आला, स्‍थानिकांच्या पुनर्वसनासह सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आल्‍याचे दिसले.
बाळगंगा धरणाचे बुडीत क्षेत्र १,२३५ हेक्टर असून कामास १३ वर्षे पूर्ण होत आली आहेत. दरम्यान, अनेक सरकारे स्थापन झालीत; परंतु धरणाची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. वरसई, जावळी, निफाड व इतर सर्व धरणग्रस्त भागातील अनेक समस्या आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी शासनाने तत्काळ सोडवाव्यात, अन्यथा येणाऱ्या काळात ग्रामस्थांना उग्र आंदोलन छेडावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

बाळगंगा धरणग्रस्तांना अनेक समस्‍या भेडसावत आहेत. सरकारकडून त्‍यांना कोणताच निधी येत नसल्याने या विभागातील रस्ते व इतर सुविधा अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. मात्र केंद्र शासनाने बाळगंगा धरण आणि कोंढाणा धरण प्रकल्पाकरिता २५४ कोटी रुपये निधी दिल्‍याचे समजते. त्यामुळे धरणाचे काम तसेच पुनर्वसन तातडीने करण्यात यावे. वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्याने येणाऱ्या काळात उग्र आंदोलन होण्याची शक्‍यता आहे.
- अविनाश पाटील, अध्यक्ष, बाळगंगा धरण संघर्ष व पुनर्वसन समिती

नवी मुंबईतील औद्योगिक प्रकल्‍पांना पाणी
नवी मुंबईतील विविध भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून या धरणाची निर्मिती केली जात आहे. धरणाचे पाणी हे प्रामुख्याने नवी मुंबईतील औद्योगिक प्रकल्पांसाठी वापरले जाणार आहे. याशिवाय कर्जत, नेरळ, खोपोली, खालापूर, पनवेल, उरण तालुक्यांतही धरणाचे पाणी दिले जाणार आहे.


धरणाबाबत सद्यस्‍थिती
बुडीत क्षेत्र - १,२३५ हेक्टर
विस्‍थापित - १३ गावांतील १,८५४ कुटुंबे
कामास सुरुवात - २०१०
२०१३ पर्यंत - ८० टक्‍के काम पूर्ण
अंदाजित खर्च - ५५० कोटी
काम रखडल्‍याने खर्चात वाढ - १२०० कोटी