
बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी
जोगेश्वरी, ता. १९ (बातमीदार) ः गरजू बेरोजगार युवक व युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप चारकोप विधानसभा व आमदार योगेश सागर यांच्या संकल्पनेतून चारकोप मतदारसंघात शनिवारी (ता. २१) सकाळी कांदिवली येथील गोरसवाडी मैदान येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यात नामांकित उद्योग/कंपन्यांमध्ये नोकरीची संधी, कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण, स्टार्टअप व उद्योजकता यासाठी मार्गदर्शन, अप्रेंटिसशिप रोजगारासाठी नोंदणी, बायोडाटा कसा लिहावा व मुलाखत कशी द्यावी याचे प्रशिक्षण, मुद्रा लोन, स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी www.mahaswayam.gov.in वर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आमदार योगेश सागर यांनी सांगितले.