शैक्षणिक कर्जाच्या नावाने १० लाखांचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शैक्षणिक कर्जाच्या नावाने १० लाखांचा गंडा
शैक्षणिक कर्जाच्या नावाने १० लाखांचा गंडा

शैक्षणिक कर्जाच्या नावाने १० लाखांचा गंडा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर)ः शैक्षणिक कर्ज मिळवून देण्याच्या प्रलोभनाने एकाने सानापाडा येथे राहणाऱ्या व्यक्तीची तब्बल १० लाखांची फसवणूक केली आहे. अक्षय पवार असे या भामट्याचे नाव असून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक व्यक्तींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सानपाडा पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सानपाडा सेक्टर- १६ मध्ये राहणाऱ्या आनंद गायकवाड यांनी दोन्ही मुलांना शिक्षणासाठी जर्मनी व कॅनडा या देशांत पाठवायचे होते. त्यामुळे त्यांना ३५ लाख रुपये शैक्षणिक कर्जाची गरज होती. त्यासाठी त्यांनी मार्च २०२२ मध्ये एका नातेवाईकाच्या ओळखीतून अक्षय पवार याची भेट घेतली होती. त्या वेळी अक्षय पवार याने तो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेल्स ऑफिसर या पदावर काम करीत असल्याचे सांगून ओळखपत्रसुद्धा दाखवले होते. त्यामुळे गायकवाड यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. तसेच प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स, फ्रँकिंग, स्टॅम्प पेपरसाठी १० लाख रुपये अक्षय पवार याला दिले होते. एप्रिल २०२२ मध्ये गायकवाड यांच्या मुलाला जर्मनी देशात पुढील शिक्षणासाठी जायचे असल्याने ते अक्षय पवार याला वारंवार फोन करून शैक्षणिक कर्ज मंजुरीबाबत विचारणा करत होते; मात्र अक्षय पवार हा नेहमी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना टाळत होता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गायकवाड यांनी सानपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
---------------------
पुणे पोलिसांकडून अटक
गायकवाड यांनी लोअर परळ येथील एसबीआय बँकेत जाऊन चौकशी केली असता, अक्षय पवार याने कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने अनेक लोकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याने त्याला बँकेतून काढून टाकल्याची माहिती मिळाली होती. या वेळी गायकवाड यांनी अक्षयचे घर गाठले असता, त्याला पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केल्याचे त्याच्या आईने सांगितले.