मुंब्रा बायपासवर दुचाकीस्वाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंब्रा बायपासवर दुचाकीस्वाराचा मृत्यू
मुंब्रा बायपासवर दुचाकीस्वाराचा मृत्यू

मुंब्रा बायपासवर दुचाकीस्वाराचा मृत्यू

sakal_logo
By

कळवा, ता. १९ (बातमीदार) : दारूच्या नशेत गाडी चालवल्याने ट्रकला दुचाकी धडकून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मुंब्रा बायपास मार्गावर घडली. मंगळवारी रात्री रवींद्र पाटील (रा. तळोजा) हा मुंब्रा बायपास रस्त्यावरून दुचाकीवरून मुंब्र्याच्या दिशेने जात असताना शिवराम मामा यांच्या बंगल्याजवळ ट्रकला धडक देऊन खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारांसाठी वाहतूक पोलिसांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. वाहतूक पोलिसांना रवींद्रच्या गाडीत दारूची बाटली सापडली. यासंदर्भात मुंब्रा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मुंब्र्यात तरुणावर जीवघेणा हल्ला
कळवा, ता. १९ (बातमीदार) : मुंब्रा रेल्वे स्थानक एम. गेटजवळ मध्यरात्री चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्‍ल्‍यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दिवा येथे राहणारा विकास सुरुवाडे (३८) हा काही कामानिमित्त मंगळवारी रात्री मुंब्र्यात आला होता. त्याचा मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणाबरोबर देण्याघेण्यावरून वाद सुरू असताना अचानक चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला चढवला. या तरुणांनी त्याच्या डोक्यावर सहा वेळा वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. मुंब्रा पोलिसांनी त्याला उपचारांसाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले; परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यासंदर्भात मुंब्रा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अन्य आरोपी फरार आहेत. मुंब्र्यात महिनाभरात आतापर्यंत तीन जणांची हत्या झाली असून मुंब्र्यातील तरुण नशेच्या पदार्थांच्या आहारी जात असल्याने अशा घटना घडत असल्याने पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भोसले या घटनेचा तपास करीत आहेत.