
उत्तरप्रदेशातील हत्येचे नवी मुंबई कनेक्शन
पनवेल, ता. १९ (वार्ताहर) : उत्तर प्रदेश राज्यातील देल्हूपूर भागात हत्या करून नवी मुंबईत पळून आलेल्या चौकडीला गुन्हे शाखा युनिट-२ ने खारघर परिसरातून अटक केली आहे. इम्रान असीर खान (३०), मोहम्मद सलमान असीर खान (२९), गुफारान असीर खान (२०) आणि मोहम्मद मुजीद इब्रर अली (२२) अशी या मारेकऱ्यांची नावे असून त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील तौकलपूर येथे राहणारा मृत व्यक्ती तसेच आरोपींमध्ये पूर्वीपासून वाद होता. याच वादातून १४ डिसेंबर रोजी मृत व्यक्ती रकिब यांची मोटारसायकलवरून देल्हूपूर बाजारातून घरी जात असताना आरोपींनी लाठ्याकाठ्या, लोखंडी सळईने हल्ला केला होता. तसेच आरोपींनी त्यांच्याकडील अग्निशस्राने गोळीबार करून पलायन केले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या रकिबचा दोन दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तसेच घटनेनंतर चारही आरोपी नवी मुंबईत पळून आले होते. याबाबतची माहिती देल्हूपूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी नवी मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण फडतरे, संदीप गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, वैभवकुमार रोंगे व त्यांच्या पथकाने गुन्ह्यातील ४ आरोपींना खारघरमधून अटक केली आहे.