गरम कपड्यांच्या मागणीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरम कपड्यांच्या मागणीत वाढ
गरम कपड्यांच्या मागणीत वाढ

गरम कपड्यांच्या मागणीत वाढ

sakal_logo
By

वडाळा, ता. १९ (बातमीदार) ः शहरात अचानक वाढलेल्या थंडीमुळे गरम कपड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. बाजारात या कपड्यांच्‍या खरेदीसाठी गर्दी वाढल्‍याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, सीएसएमटी, परळ, दादर, वडाळा येथील बाजारपेठेत लहान बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत गरम कपड्यांच्या खरेदीसाठीचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. स्वेटर, जॅकेट, कोट, सॉक्स, मफलर इत्यादी गरम कपड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असून फॅशनेबल स्वेटशर्टला तरुणाईची पसंती अधिक असल्‍याचे दिसून येत आहे.
डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत दडी मारून बसलेली थंडी अचानक वाढल्याने अनेकांच्या घरातील अडगळीत पडलेले स्वेटर आणि कानटोप्‍या बाहेर आल्‍या आहेत; तर बाजारपेठेत उबदार कपडे खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानांत, मॉलमध्ये आणि रस्त्यावरील स्टॉलवर सध्या नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. नानाविध रंगातील आणि वेगवेगळ्या आकारांतील फॅशनेबल स्वेटर, बायकर जॅकेट, स्वेटशर्ट खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.

खरेदीचे हॉट स्‍पॉट
क्रॉफर्ड मार्केट, सीएसएमटी, परळ, दादर, वडाळा येथील पदपथांवर पंजाब, लुधियाना, दिल्ली, नेपाळ या भागातून आलेल्या स्वेटर विक्रेत्यांनी स्टॉल मांडले आहेत. स्वेटर, लोकरीचे स्कार्फ आदी कपड्यांची मागणी वाढली आहे.

या कपड्यांना अधिक पसंती
थंडीपासून संरक्षण करण्याबरोबर नवीन फॅशनेबल कपडेही बाजारपेठेत दाखल झाले आहेत; तर स्वेटरमध्ये ‘मांटोकारलो’ हा ब्रॅण्ड सर्वाधिक चांगला समजला जात असल्याने त्याला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. तरुणांसाठीचे विंटर जॅकेट, चेक्‍स स्वेटर, पॉकेट स्वेटर, दुचाकी चालवताना वापरले जाणारे ‘बायकर स्वेटर’ उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे सध्या स्वेटशर्ट''ची फॅशन सुरू झाली आहे. हे शर्ट टोपी असलेले आणि टोपी नसलेले, अशा दोन प्रकारात व वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहेत. तो मुलांबरोबरच मुलींनाही वापरता येत असून त्याचे ‘नॅचरल ब्लू’, ‘ऑकि‍टीव्ह’, ‘आदिदास’ असे वेगवेगळे ब्रॅण्ड बाजारात उपलब्ध आहेत.

स्वेटशर्ट आणि जॅकेटला सध्या तरुणवर्गातून मोठी मागणी आहे. काळा, पांढरा आणि खाकी रंगातील हे उबदार कपडे तरुणाईच्या भुरळ घालत आहेत. त्याचप्रमाणे स्वेटर जॅकेटबरोबरच नक्षीकाम केलेल्या महिलांसाठीच्या शॉल, हातमोजे, मफलर, कानटोपी, कानपट्टी, सॉक्‍स यांनाही चांगलीच मागणी आहे. बाजारात लॉंग कोट, झीपर यासारखे स्वेटरचे नवीन प्रकारही आले आहेत. बच्चेकंपनीसाठी डॉलीपॉपी, तसेच चायना स्वेटरचीही खरेदी केली जात आहे.
– सुग्रीव गुप्ता, स्वेटर विक्रेते

भाववाढीचा परिणाम नाही
या वर्षी थंडीसाठी लागणाऱ्या गरम कपड्यांच्या किमतीत २० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे; पण याचा विक्रीवर काहीही परिणाम झाला नाही, अशी माहिती राबीन जमादार या स्वेटर विक्रेत्याने दिली. प्रत्येक ऋतूमध्ये फॅशन बदलते त्याचप्रमाणे हिवाळ्यातही शहरातील तरुणांच्या अंगावर जॅकेट, हॅण्डग्लोज आणि टोपी दिसू लागली आहे. स्वेटरची फॅशन बदलून आता स्वेटरशर्ट घेण्याकडे महाविद्यालयातील तरुणांचा कल असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

स्वेटर किंमती-
लहान मुलांचे स्वेटर ३०० ते ८०० रुपये
प्रिंट स्वेटर - ४०० ते ८०० रुपये
स्वेट शर्ट - ४०० ते १ हजार रुपये
जाकेट - ६०० ते १,२०० रुपये
शॉल - ३०० ते २००० रुपये
मफलर - २०० ते ५०० रुपये
कार्डीगन - ६०० ते २,५०० रुपये