काळू नदीवरील धरणाला विरोध

काळू नदीवरील धरणाला विरोध

Published on

मुरबाड, ता. १९ (बातमीदार) : काळू नदीवरील धरणाला विरोध दर्शविण्यासाठी गुरुवारी मुरबाड तहसीलदार कार्यालय येथे काळू धरण प्रकल्प संघर्ष समिती व श्रमिक मुक्ती संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शहरी भागातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी काळू नदीवर धरण बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे. काळू धरण बांधल्यास पाच गावे पूर्णतः व आठ गावे अंशतः बुडणार आहेत; तर कित्येक गावांचे रस्ते पाण्याखाली जाणार आहेत. धरण बांधण्यास परवानगी देताना ग्रामसभांचे संवैधानिक अधिकार डावलण्यात आले आहेत. स्थानिक लोकांना विश्वासात घेतलेले नाही. मोठे धरण बांधण्‍याऐवजी लहान बंधारे बांधले तर कोणत्याही गावाला विस्थापित करावे लागणार नाही, असे सांगत ग्रामस्थांनी धरणाला विरोध दर्शविला. यावेळी आरपीआय ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने, श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे आदींची भाषणे झाली. नंतर धरण बांधण्यास विरोध असल्याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी संतोष निमसे, अशोक पठारे यांच्‍यासह तळेगाव, चासोळे, आंबिवली, झाडघर, वाकळवाडी परिसरातील ग्रामस्‍थ यावेळी उपस्थित होते.
-------------------------------------
धरणाला विरोध का ?
एमएमआरडीएने दहा लाखाचे पॅकेज जाहीर केल्‍यानंतर त्याला स्थानिकांकडून विरोध करण्‍यात येत होता. शासकीय आकडेवारीनुसार विस्थापित कुटुंबांची संख्या ७८७ असली तरी अनेक कुटुंबे विभक्त झाल्याने प्रत्यक्षात कुटुंबियांची संख्या अधिक असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. ही रक्कम घेऊन आम्ही कुठे पुनर्वसित व्हायचे हा यक्ष प्रश्न असल्याने स्थानिकांकडून विरोध करण्‍यात येत आहे.
---------------------------------------
धरणे गाळमुक्‍त करा
काळू धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या गावांबरोबरच १७-१८ पाड्यांना जाणारे रस्ते पाण्याखाली येणार असल्याने त्यांचा संपर्क तुटणार आहे. त्यांच्या पुनर्वसनाचीही सोय करणे गरजेचे आहे. मुंबई-ठाण्याला पाणी पुरवणाऱ्या जुन्‍या धरणांचा एक तृतीयांश भाग गाळाने भरलेला आहे. हा गाळ काढल्यास पाण्याची उपलब्धता वाढेल. पिण्याचे पाणी हे औद्योगिक वापर, बागबगीचे, वाहने धुणे अशा कामासाठी वापरले जाते ते टाळल्यास आणि पाणीगळती, पाणीचोरी रोखल्यास पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढेल. त्यामुळे नवीन मोठ्या धरणाची आवश्यकता भासणार नसल्‍याचे मत काळू धरणाच्या मुख्य विरोधक असलेल्‍या श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेत्या इंदवी तुळपुळे यांनी व्‍यक्‍त केले.
-------------------------
फोटो ओळी
मुरबाड : काळू नदीवर धरण बांधण्यास विरोध करण्यासाठी मुरबाड तहसीलदार कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com