
विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात नणंद, सासूला दणका
नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : कोपरखैरणेतील आरती मल्होत्रा (३९) या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या नणंद आणि सासूचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे या दोघींच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, कौपरखैरणे पोलिस या दोघींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात सासऱ्यालादेखील आरोपी केले आहे.
कोपरखैरणे सेक्टर-२० मधील न्यू रावेची अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आरती मल्होत्रा यांनी ५ डिसेंबरला पाच वर्षीय मुलासह इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली होती. या घटनेत आरतीचा ५ वर्षीय मुलगा बचावला होता. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार आरतीचा भाऊ विशाल शर्मा याने कोपरखैरणे पोलिस ठाण्यात केली होती. त्यानुसार पोलिसांनी आरतीचा पती विजेंद्र (४३), नणंद अंजली मल्होत्रा (४०) व सासू किरण मल्होत्रा (५७) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून पती विजेंद्रला पोलिसांनी अटक केली आहे.
घटनेतील सहआरोपी नणंद व सासू या दोघींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती; ठाणे येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिशांनी या दोघींचा जामीन फेटाळून लावला आहे. त्यांना अटक करण्यासाठी आम्ही घरी गेलो होतो; मात्र त्या कोपरखैरणे सेक्टर-२० मधील पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आल्याचे सहाय्यक निरीक्षक योगेश गायकवाड यांनी सांगितले. या प्रकरणात आरतीच्या सासऱ्यालादेखील सहआरोपी करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.