
पाम उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘समाधान’ मोहीम
मुंबई, ता. १९ ः देशातील पाम वृक्ष लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती, साहित्य, सेवा आणि नवे मार्ग मिळावेत यासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटतर्फे ‘समाधान’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना हवे असलेले सर्व साह्य केले जाईल.
पाम तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०२७ पर्यंत देशात १० लाख हेक्टरवर पाम वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गोदरेज ॲग्रोव्हेटतर्फे त्या व्यतिरिक्त पाच वर्षांत आणखी साठ हजार हेक्टरवर पाम वृक्ष लावण्यात येतील, अशी माहिती गोदरेज ॲग्रोव्हेटचे व्यवस्थापकीय संचालक बलरामसिंह यादव यांनी दिली. पाम लागवडीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आपली उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यासाठी या मोहिमेमार्फत शेतकऱ्यांना साह्य केले जाईल. त्याद्वारे शेतकऱ्यांना या क्षेत्रात जाणकार बनवले जाईल. राष्ट्रीय खाद्यतेल मिशन ऑईल पाम ही मोहीम ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झाल्यानंतर त्याला अनुसरून गोदरेजने ही मोहीम हाती घेतली आहे. यासाठी २०१७ पर्यंत देशात ५० ‘समाधान’ केंद्रे उभारली जातील. त्या प्रत्येकाद्वारे दोन हजार हेक्टरवर पाम वृक्ष लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. पाम लागवडीतील जगातील सर्वोत्तम पद्धती भारतात आणण्याचा हा प्रयत्न आहे, असेही यादव यांनी सांगितले.