
अदाणी इंटरप्राईजेसचा वीसहजार कोटींचा एफपीओ
मुंबई, ता. १९ ः अदाणी एंटरप्रायजेसतर्फे वीस हजार कोटी रुपयांचा एफ.पी.ओ. (फॉलोऑन पब्लिक ऑफर) आणण्यात आला असून यात सामान्य गुंतवणूकदारांना ६४ रुपये सवलत मिळेल. आज (ता. १९) कंपनीतर्फे पत्रकारांना ही माहिती देण्यात आली. अदाणी एंटरप्राईजेच्या शेअरची यापूर्वीच शेअर बाजारात नोंदणी झाली असून त्यांचे व्यवहारही सुरू आहेत. त्यानंतर कंपनीने हा दुसरा इशू बाजारात आणला असून त्याला एफ.पी.ओ. असे म्हणतात.
या एफपीओचा किंमतपट्टा ३,११२ रु. ते ३,२७६ रुपये एवढा आहे. सध्या शेअर बाजारात या शेअरचा भाव साधारण ३,५०० रुपयांच्या आसपास असून त्यापेक्षा साधारण दहा टक्के कमी भावात हा शेअर सगळ्या गुंतवणूकदारांना मिळणार आहे. मात्र, त्यातही एफपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना ठरलेल्या किंमतपट्ट्यापेक्षा ६४ रुपयांची सवलत मिळेल. हा इशू गुंतवणुकीसाठी २७ ते ३१ जानेवारीदरम्यान खुला राहील; तर बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (अँकर इन्व्हेस्टर) तो २५ जानेवारी रोजी खुला होईल. गुंतवणूकदारांना किमान चार शेअर व त्यापुढील चारच्या पटीत शेअरसाठी अर्ज करावा लागेल, अशी माहिती आज देण्यात आली. यातील १०,८६९ कोटी रुपये हे काही उपकंपन्यांच्या ग्रीन हायड्रोजन आदी प्रकल्पांच्या विस्तार योजनांसाठी वापरले जातील; तर ४,१६५ कोटी रुपये हे अदाणी एअरपोर्ट होल्डिंग, अदाणी रोड ट्रान्सपोर्ट लि. व मुंद्रा सोलर लि. यांची जुनी कर्जे फेडण्यासाठी वापरले जातील. उरलेले पैसे कंपनीच्या अन्य उद्दिष्टांसाठी वापरले जातील.