
मुंबई विमानतळावरून तीन किलो सोने जप्त
मुंबई, ता. २० : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) गुरुवारी केलेल्या कारवाईत तीन किलो सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत एक कोटी ५० लाख रुपये असून या प्रकरणी अझरबैजान येथील नागरिक असलेल्या माहिर अलियेव (वय ३७) याला अटक करण्यात आली. एआययूच्या अधिकाऱ्यांना विमानतळावर तपासणीदरम्यान एका विदेशी नागरिकाला संशयास्पद स्थितीत पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून तीन किलो सोने जप्त करण्यात आले. आरोपी माहिर अलियेव हा दुबईहून अझरबैजानच्या पासपोर्टवर मुंबईत आला होता. त्याने हे सोने त्याच्या अंतर्वस्त्रात आणि ट्रॉलीच्या सामानात लपवून ठेवले होते. दुबईतील एका व्यक्तीने ही बॅग घेऊन जाण्याच्या बदल्यात मोठी रक्कम देण्याचे वचन दिले होते, असे माहिरने चौकशीदरम्यान सांगितले. न्यायालयाने आरोपी माहिरला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काही दिवसांपूर्वी दुबईच्या दोन प्रवाशांना विमानतळावर ४.५ कोटी रुपये किमतीच्या ८.२ किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली होती.