
युनियन बँकेच्या नफ्यात १०६ टक्के वाढ
मुंबई, ता. २० ः युनियन बँकेच्या सार्वजनिक क्षेत्रातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या तिमाहीतील नफ्यात वार्षिक १०६ टक्के एवढी घसघशीत वाढ झाली आहे. या तिमाहीत बँकेला २,२४५ कोटी रुपये करोत्तर नफा मिळाला.
बँकेच्या संचालक मंडळाने आज (ता. २०) या तिमाही निकालांना मंजुरी दिली. २०२१मधील याच तिमाहीत बँकेला १,०८५ कोटी रुपये नफा झाला होता; तर जुलै ते सप्टेंबर २०२२ या तिमाहीत हा नफा १,८४८ कोटी रुपये होता. या दोन्हीपेक्षा नुकत्याच संपलेल्या तिमाहीतील बँकेची कामगिरी उत्तम झाली आहे. बँकेच्या एमडी व सीईओ ए. मणिमेखलै यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
बँकेचा एकूण व्यवसाय या तिमाहीत वार्षिक १६.३१ टक्के दराने वाढला. दिलेल्या कर्जाचा आकडा २०.०९ टक्के; तर ठेवींची रक्कम १३.६१ टक्के वाढली. डिसेंबरअखेरीस बँकेचा व्यवसाय १८ लाख कोटी रुपयांहूनही जास्त झाला आहे. बँकेने दिलेली किरकोळ ग्राहकांची, कृषी ग्राहकांची व एमएसएमई ग्राहकांची कर्जे १७.७६ टक्के दराने वाढली. डिसेंबरअखेरीस बँकेचा निव्वळ एनपीए घटून २.१४ टक्क्यांवर आला.
बँकेच्या परदेशी शाखांसह एकूण ८,७१० शाखा व १०,९५३ एटीएम आहेत. प्रधानमंत्री जनज्योती बिमा योजनेत या तिमाहीत साडेपाच लाख नवे लाभार्थी आले; तर प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेत २१ लाखांहून जास्त लाभार्थी आले. प्रधानमंत्री जनधन योजनेत बँकेने २.८६ कोटी खाती उघडली असून त्यात ८,१६२ कोटी रुपये जमा आहेत; तर अटल पेन्शन योजनेतही असंघटित क्षेत्रातील साडेतीन लाखांहूनही जास्त लाभार्थी आहेत. युनियन नारीशक्ती योजनेनुसार ११,५६२ महिला उद्योजकांना चौदाशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले.