टॉलस्टॉय फार्म जागतिकक वारसास्थळ व्हावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टॉलस्टॉय फार्म जागतिकक वारसास्थळ व्हावे
टॉलस्टॉय फार्म जागतिकक वारसास्थळ व्हावे

टॉलस्टॉय फार्म जागतिकक वारसास्थळ व्हावे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : महात्मा गांधींचा मुक्काम असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील टॉलस्टॉय फार्म हाऊसच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या स्थळाला जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून मोहिमेला सुरुवात करण्याची गरज मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. केवळ एका देशापुरते हे स्थळ मर्यादित न राहता या स्थळाला जागतिक वारसा दर्जा मिळण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका देशाकडून प्रयत्न होण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाचे माजी संचालक आणि स्तंभलेखक सुधींद्र कुलकर्णी यांनी या स्थळाला जागतिक दर्जा मिळवण्यासाठी भारतातून तसेच आफ्रिकेतूनही प्रयत्न व्हायला हवेत, असे मत व्यक्त केले.

महात्मा गांधी यांनी आपल्या वयाची तब्बल २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत काढली. त्या वेळी वर्णभेदाच्या मुद्द्यावर त्यांनी भारतीयांना जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन एकत्र आणले. सत्याग्रहाच्या संकल्पनेची पाळेमुळे ज्या ठिकाणी रुजली त्या टॉलस्टॉय फार्म हाऊसच्या ठिकाणी वास्तूचा कोणताही भाग उरलेला नाही. त्यामुळे या वास्तूच्या पुनर्निर्माणाच्या निमित्ताने मोहन हिरा यांनी स्वयंखर्चाने या जागेचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या पुढाकाराच्या निमित्ताने प्रेस क्लब येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. भारतातील गांधीप्रेमी संस्थांनी या वास्तूच्या उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी सुधींद्र कुलकर्णी यांनी केली.

गांधीजींशी संबंधित सन १९०३ मधील आंतरराष्ट्रीय प्रिंटिंग प्रेस, गांधी मंडेला म्युझियम यांसारख्या वास्तूंचे जतन व्हावे, अशीही मागणी त्यांनी या वेळी केली. गांधीजींच्या सत्याग्रहाला दक्षिण आफ्रिकेतून सुरुवात झाली. टॉलस्टॉय फार्म हाऊससाठी जागा ही युरोपातील एका ज्यू व्यक्तीने दिली. तसेच दक्षिण आफ्रिका आणि रशिया यांसारख्या देशातून अनेक लोक गांधीजींच्या या सत्याग्रहाच्या अहिंसक मोहिमेशी जोडले गेले होते. त्यामुळेच गांधीजींची वास्तू ही केवळ एका देशातील लोकांपुरती मर्यादित न राहता, या वास्तूला जागतिक वारसा दर्जा मिळावा, असे सुधींद्र कुलकर्णी म्हणाले.