चला ‘आपदा मित्र’ बनूया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चला ‘आपदा मित्र’ बनूया
चला ‘आपदा मित्र’ बनूया

चला ‘आपदा मित्र’ बनूया

sakal_logo
By

दिनेश तर्फे, जोगेश्‍वरी
आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना मदत व्हावी आणि संभाव्य जीवित व वित्तहानी कमीत कमी व्हावी, या उद्देशाने मुंबई महापालिका अनोखा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाअंतर्गत मुंबईकरांना प्रशिक्षण देऊन त्‍यांना ‘आपदा मित्र’ बनवले जाणार आहे. यामुळे मुंबईत आपत्‍कालिन परिस्थिती उद्‌भवल्‍यास या मित्रांची पालिकेला मदत होईल.
केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार १८ ते ४० वयोगटातील मुंबईकरांसाठी ‘आपदा मित्र’ हा १२ दिवसांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम महापालिकेच्या परळ येथील आपत्ती व्‍यवस्‍थापन प्रशिक्षण केंद्रात सुरू करण्‍यात येणार आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात येणारे हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून पालिका क्षेत्रासाठी अर्थात मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्‍हा या दोन जिल्ह्यांच्या आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणांमार्फत मुंबईतील रहिवाशी नागरिकांना यात सहभागी होता येईल.
प्रशिक्षणासाठी १८ ते ४० या वयोगटातील किमान सातवी उत्तीर्ण असलेले मुंबईचे रहिवासी अर्ज करू शकतात. तथापि, संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेले, वैद्यकीय व्यावसायिक आणि स्थापत्य अभियंता यांच्यासाठी वयाचे निकष शिथिल करण्‍यात येणार आहेत. शारीरिक, मानसिक व वैद्यकीय आरोग्य चांगले असणे आवश्यक असून तसे आवश्यक ते फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल. आपत्कालीन परिस्थितीत प्रशिक्षण प्राप्‍त असलेल्या प्रशिक्षित नागरिकांची गरजूंना मदत व्हावी आणि संभाव्य जीवित व वित्तहानी कमीत कमी व्हावी, या प्रमुख उद्देशाने हे प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे. या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई शहर व मुंबई उपनगरातील प्रत्‍येकी ५०० याप्रमाणे एकूण हजार नागरिकांना प्रशिक्षित करण्‍यात येणार आहे.

काय शिकणार
प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून आपत्ती व्‍यवस्‍थापनाचे धडे प्रात्यक्षिकांसह देण्यात येतील. यामध्ये पूर बचाव, शोध व बचावकार्य, प्रथमोपचार, सीपीआर, प्राथमिक अग्निशमन इत्‍यादीचे प्रात्‍याक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणस्थळी ये-जा करण्‍याकरिता दैनंदिन दीडशे रुपये भत्ता देण्यात येईल. त्याचबरोबर प्रशिक्षणादरम्‍यान प्रशिक्षणार्थींच्‍या चहा व भोजनाची व्‍यवस्‍था करण्यात येईल. प्रशिक्षण (रविवार वगळून) यशस्‍वीरीत्‍या पूर्ण केल्‍यानंतर ‘आपदा मित्र’ प्रमाणपत्र व ओळखपत्रदेखील प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
– महेश नार्वेकर, संचालक, आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन विभाग

कसे सहभागी व्‍हाल?
नागरिकांनी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्जासोबत त्यांचे रहिवासी प्रमाणपत्रासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, नजीकच्या काळातील विद्युत देयक इत्यादी कागदपत्रांसह मुंबई महापालिकेच्या आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन विभागाशी ०२२-२२६९४७२५–२७ या संपर्क क्रमांकांवर अथवा co.dm@mcgm.gov.in या ई मेल पत्त्यावर संपर्क साधावा.