
खवय्यांना आवडे कौल चिकन
अजित शेडगे, माणगाव
हिवाळा सुरू झाला की उबदार कपडे बाहेर येतात, ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसतात. अनेकांकडून पोपटी पार्टीचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात कौल चिकन पार्टीची क्रेझ वाढत आहे.
थंडीचा कडाका वाढत असतानाच खवय्यांची पोपटीबरोबरच कौल चिकनला पसंती मिळत असून सहभोजनासाठी, रात्री पार्टी जागरण करताना कौल चिकण बनवल्याला पसंती दिली जात आहे.
माळरानात अथवा घराच्या अंगणात दगडांची चूल मांडून त्यात कौल ठेवले जाते. चांगला जाळ करून गरम झालेल्या कौलावर चिकन भाजून घेतले जाते. कौलावर चिकन भाजून खाण्याची ही पद्धती म्हणजे कौल चिकन होय. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक तरुण व पर्यटकांची कौल चिकनला मागणी असून अल्पावधीत संकल्पना तरुणाईमध्ये विशेष प्रसिद्ध झाली आहे.
सुरुवातीला कौल चांगले स्वच्छ धुवावे, चवीनुसार मीठ मसाला लावून चिकनचे तुकडे एक ते दोन तास मुरून द्यावे, त्यानंतर कौलाच्या तयार केलेल्या भट्टीवर मीठ-मसाला-चिकन खरपूस भाजावे, ते मध्येमध्ये परतवावे, खरपूस भाजून झाल्यावर चिकन कौल खाण्यासाठी तयार होते. त्यात चवीनुसार आंबट, तिखट चव घ्यावी.
थंडीच्या दिवसांत पोपटी पार्टीबरोबरच कौल चिकनच्या पार्ट्यांना तरुणाईची पसंती मिळत आहे. माळरानावर लाकूड फाटा जाळून पारंपरिक पद्धतीने कौलांचा वापर करून तयार केलेले चिकन चवदार लागते. रुचकर खाण्याचा एक वेगळा आनंद घेण्यासाठी कौल चिकन चांगला पर्याय आहे.
- सिद्धेश पालकर, माणगाव
माणगाव ः माळरानावर कौल चिकनच्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत.