
बदलापुरात जेष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा
बदलापूर, ता. २१ (बातमीदार) : कोव्हिडनंतर परिस्थिती सामान्य होत असताना सलग दोन वर्षे घरात अडकून पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून त्यांच्या दृष्टीवर झालेला परिणाम व त्यावरील उपाययोजना यासाठी बदलापूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्य रुग्णालयाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या सहकार्यातून घेण्यात आलेल्या शिबिरात मनोरंजन कार्यक्रम, अल्पोपाहार, गप्पा गोष्टी अशा स्वरूपात एकाअर्थी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. सामाजिक बांधिलकी जपत कुळगाव-बदलापूर नगरपरिषद दुबे रुग्णालय येथे डॉ. नीता पाटील फाऊंडेशनसोबत लक्ष्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने डोळ्यांची तपासणी कक्ष करून गोरगरिब नागरिकांची फक्त २० रुपयांत नेत्रतपासणीची सेवा देण्याचे काम डॉ. प्रदीप कोळी यांच्यामार्फत होत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या स्नेहमेळाव्यासाठी ज्येष्ठ मेडिकल सोशल वर्कर रमेश कांबळे आणि डॉ. अमितकुमार गोईलकर यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.