
रखडलेल्या सेवा रस्त्याचे काम पुर्ण करावे
कासा, ता. २१ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी उड्डाणपूल येथून महालक्ष्मीच्या दिशेने रखडलेला सेवा रस्ता तयार करण्याचे काम सुरू करावे. तसेच एशियन पंपाजवळ भुयारी मार्ग करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. चारोटी ते अल्फा हॉटेलपर्यंत दुतर्फा सेवा रस्ता करण्यात आला असून तो महालक्ष्मीपर्यंत पूर्ण करण्याची मागणी नागरिकांसह प्रवाशांकडून होत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी येथे सहा ते सात वर्षांपूर्वी उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. आयआरबी ठेकेदाराने चारोटी ते महालक्ष्मीपर्यंत सेवा रस्ता तयार करायचा होता; मात्र सेवा रस्ता अपूर्ण असल्याने वाहने विरुद्ध दिशेने धावून अनेक अपघात झाले. त्यात स्थानिकांचे बळी गेले. यामुळे स्थानिकांनी तसेच चारोटी ग्रामपंचायतीनेही सातत्याने सेवा रस्त्यासाठी पाठपुरावा केला. मुंबई वाहिनीवरून बसवत पाडा येथे जाण्यासाठी हा महामार्ग ओलांडावा लागतो. त्यात अनेक वाहने एशियन पंपावर पेट्रोल, डिझेल व सीएनजी भरण्यासाठी हा महामार्ग ओलांडतात. यात शेकडो वाहनांचे अपघात झाले आहेत. कितीतरी जण मृत्युमुखी पडले. अनेक शेतकरी शेती कामासाठी हा रस्ता धोकादायक स्थितीत ओलांडतात. त्यासाठी येथे भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल बांधण्याची मागणी बसवतपाडा ग्रामस्थांनी तसेच चारोटी ग्रामपंचायतीतर्फे केली आहे; पण अजून कोणतेही काम सुरू करण्यात आलेले नाही.
-------------------
सेवा रस्ता अल्फा हॉटेलपर्यंत झाला असून हा पुढे महालक्ष्मी विवळवेढेपर्यंत करण्यात यावा. दर वर्षी जवळपास महिनाभर चालणारी या भागातली सर्वात मोठी यात्रा येथे भरत असल्याने व अनेक भागातून भाविक या यात्रेस गर्दी करत असल्याने व यामुळे खूप अपघात होत असतात. यासाठी हा सेवारस्ता महालक्ष्मीपर्यंत केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल.
- संतोष देशमुख, अध्यक्ष, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, विवळवेढे
------------------
चारोटी ते बसवत पाडा येथील विद्यार्थी, शेतकरी तसेच वाहनचालक यांना हा रस्ता ओलांडावा लागतो. यात कितीतरी बळी गेले आहेत. त्यामुळे एशियन पंपासमोर उड्डाण पूल किंवा भुयारी मार्ग करावा, अशी मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करत आहोत. अनेक वेळा चारोटी ग्रामपंचायतीतर्फे ठराव केले आहेत.
- कैलास चौरे, उपसरपंच, चारोटी ग्रामपंचायत
--------------------
महामार्ग प्रशासनातर्फे सुरक्षा सल्लागार पाहणी करीत आहेत. जेथे कामे अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामे हाती घेतली जातील. सेवा रस्त्यावरील अतिक्रमण, पार्किंगसंबंधीदेखील कारवाई करण्याचे ठरले आहे. लवकरच अशा ठिकाणी रेलिंग लावण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.
- मुकुंद अत्तरदे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण