
लाल तिखट अधिकच झणझणीत!
डोंबिवली, ता. २७ (बातमीदार) : लाल-मिरचीचे भाव वाढल्याने बाजारात विविध प्रकारच्या मसाल्यांचे भाव वाढलेले आहेत. मसाल्यांचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गोडा मसाला (काळा मसाला), पंजाबी गरम मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, कांदा-लसूण मसाला, कोकणी मसाला, स्पेशल गरम मसाला असे विविध प्रकारचे मसाले बनवताना गृहिणींना विचार करावा लागत आहे. भारतीय आहारात मसाल्याचे महत्त्व अधिक आहे. गेल्या काही वर्षांपासून बाजारात विविध कंपन्यांचे पाकीटबंद मसाले ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत.
साधारण मसाल्याचा नवा हंगाम मार्च ते मे असा तीन महिन्यांचा असतो. त्यामध्ये सर्वांत जास्त मिरची ही महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये होते. यंदा पाऊस लांबल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे मिरच्यांचेही उत्पादन कमी झाले. आंध्र प्रदेशात सर्वाधिक लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर कर्नाटक व मध्य प्रदेशात घेतले जाते. महाराष्ट्रातील खानदेशात लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. तेलंगणात तिखट; तर कर्नाटकात कमी तिखटाच्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते.
अनेक गृहिणी घरीच लाल तिखट तयार करतात. सुक्या मिरचीचा वापर भाज्यांसाठी किंवा इतर मसाल्यांसाठी केला जातो. आता मिरचीच्या किमती वाढल्याने लाल तिखटाची किंमतही वाढणार आहे. मसाल्यांच्या किमतीही झपाट्याने वाढल्या आहेत. हळद, मिरची यासह मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या इतर काही वस्तूंच्या दरात यंदा चांगलीच वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गुंटूर मिरचीचे भाव किलामागे १६० ते १८० रुपयांच्या घरात होते. सध्या २५० ते ४०० रुपयांना विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले. यासह लवंगही महागली असून सध्या ९०० ते १२०० रुपये प्रतीकिलो दर आहे.
-----------------------
इंधन दरवाढीचा परिणाम
भारतात विविध प्रकारचे मसाले तयार होतात. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने मसाले महाग झाले आहेत. मागील पाच ते सहा महिन्यांपासून मसाला करण्यासाठी लागणारे हळद, जिरे, फूल आदींची आवक कमी झाली आहे. यातच महागाईने कळस गाठला आहे. परिणामी मसाल्याच्या वस्तू महाग झाल्या असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
-----------
कोट
यंदा मसाल्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे स्वयंपाकाला त्याची मोठी झळ बसत आहे.
- अश्विनी नेमाडे, गृहिणी
-------------------
जिन्नस (प्रतिकिलो दर रुपयांमध्ये)
हिरवी वेलची २५०० ते ३०००
दालचिनी ६०० ते ८००
शहाजिरा ५०० ते ८००
काळे मिरे ६०० ते १०००
हळद ४००
तमालपत्र २००
बडीशेप ४५० ते ५००
जिरे २०० ते ३५०
धणे २८०