
शिवचरित्रातून गडकिल्ल्याची आवड
संदीप पंडित, विरार
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाला भुरळ पाडणारे नाव! त्यांचे पराक्रम, त्यांचे युद्धकौशल्य, त्यांची महिलांप्रति असलेली आदराची भावना यातून अनेक जण आजही शिवसाहित्याकडे आकर्षित होत आहेत. अशीच एक नालासोपाऱ्यातील शिवभक्त म्हणजे हमीदा खान!
भटकंतीचा ध्यास असलेल्या हमीदा खान यांनी ‘वायएचएआय’ या संस्थेमार्फत १९९० सालापासून आपल्या गड-किल्ले भ्रमंतीला सुरुवात केली. १९९८ मध्ये शिवतीर्थ किल्ले रायगड भटकंतीमध्ये शिवकालीन अभ्यासक आप्पा परब यांच्यासोबत रायगड किल्ला पाहिला. त्यानंतर त्यांनी स्वराज्यातील सर्व किल्ले पाहण्याचे बळ द्यावे, असे रायगडावर शिवाजी महाराजांना साकडे घातले. त्यानंतर त्यांनी गड भ्रमंतीला सुरुवात केली. त्यांनी १९९९ साली १०० किल्ले पालथे घातले; तर २००० साली १५० किल्ले, तर २००१ साली १०० किल्ल्यांची सफर पूर्ण केली. त्यांनी सलग तीन वर्षांत ३५० किल्ले सर केले आहेत.
हमीदा खान यांनी राजसदरेवर, शिवसमाधीजवळ, शिर्काई मंदिरात व जगदिश्वर मंदिरात दररोज संध्याकाळी दिवाबत्तीची सोय करावी, अशी मागणी केली होती. यापूर्वी काही स्वयंसेवी संस्था, दुर्गप्रेमींनी तसा प्रयत्नही केला होता, पण पुरातत्त्व खाते परवानगी देत नव्हते. या परिसंवादात ‘श्री संभाजीराजेंनी’ येत्या काही दिवसांतच आपण सर्व शिवभक्तांच्यावतीने दररोज या ठिकाणी दिवा लावण्यात येईल, असे जाहीर केले होते. हमीदा यांनी केलेल्या विनंतीनुसार किल्ले रायगडावर, श्री संभाजीराजे म्हटल्याप्रमाणे आज सर्वत्र दिवे लावण्यात आलेले आहेत.
====
सर्वांचे सहकार्य
दुर्ग भ्रमंती करताना घरातून कोणाचाच विरोध नव्हता, असे हमीदा खान मोठ्या अभिमानाने सांगतात. आई, बहीण, घरातील इतर सदस्य, मित्र परिवार या सर्वांचे यात खूप सहकार्य लाभल्याचा त्या सतत उल्लेख करत असतात.