
कामगार आघाडीचे तीन महिन्यांत दहा यशस्वी वेतनवाढ करार
घाटकोपर, ता. २१ (बातमीदार) ः मुंबई आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कामगारनेते डॉ. दत्ता सामंत प्रणित कामगार आघाडीच्या अखत्यारीतील महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने मुंबईसह राज्यातील कंपन्यांत गेल्या तीन महिन्यांत १० यशस्वी वेतनवाढ करार केले आहेत. त्यातून कामगारांना भरघोस पगारवाढ झाली आहे.
चेंबूर येथील इनलेक्स हॉस्पिटलमधील कामगारांसाठी झालेल्या करारानुसार सर्व कामगारांना भरघोस पगारवाढ झाली आहे. हा करार युनियनचे अध्यक्ष भूषण सामंत तसेच सरचिटणीस वर्गीस चाको; तर हॉस्पिटलच्या वतीने अध्यक्ष बी. के. स्वामी (ट्रस्टी), एच. आर. जीवनचंद्र कर्णिक यांनी करारावर सह्या केल्या; तर मुलुंड येथील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीत तीन वर्षांसाठी पगारवाढ करार झाला आहे. त्यानुसार कामगारांना दरमहा तब्बल १३ हजार १०० रुपयांची वाढ झाली आहे. व्यवस्थापनातर्फे एम्प्लॉई मुख्य परमिंदर सिंग घुमान, रामजी शिंदे, समशुल खान (एचआर); तर युनियनच्या वतीने भूषण सामंत यांच्यासह वर्गीस चाको, संजय कोळवणकर यांनी सह्या केल्या. विट्रम ग्लास या कारखान्यातील कामगारांसाठी असाच करार करण्यात आला असून, मलबार हिल क्लब तसेच सिसको रिसर्च या कंपनीसह कल्याण येथील नॅशनल पॅरोक्साईड येथेही पगारवाढ करार करण्यात आला आहे. मरीन लाइन्स येथील वेस्ट अँड हॉटेलमधील कामगारांनी त्यांच्या जुन्या युनियन सोडून कामगार आघाडीत प्रवेश केला आहे. त्यांचाही वेतनवाढ करार करण्यात आला आहे. त्यांची तीन हजार ९०० रुपयांची वेतनवाढ झाली आहे. बॉम्बे जिमखाना येथील कामगारांसाठी १० हजारांची दरमहा वाढ झाली असून, गणेश बेंजो प्लास्ट लिमिटेडमध्ये तीन वर्षांसाठी अभियंते आणि सुपरवायझर यांच्यासाठी तब्बल २० ते २५ हजारांची वाढ झाली आहे. कल्याणमधील नॅशनल पॅरोऑक्साईडमध्येही चार वर्षांसाठी १४ हजारांची घवघवीत वाढ झाली आहे. दरम्यान, नाशिकमधील सातपूर येथील एबीबी इंडिया लिमिटेड या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपनीत कामगारांना दरमहा तब्बल २४ हजारांची वाढ झाली आहे. हा करार चार वर्षांसाठी असल्याचे कामगार आघाडीचे अध्यक्ष भूषण सामंत यांनी सांगितले.