महापालिकेच्या प्रदर्शनात अवतरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या प्रदर्शनात अवतरणार
महापालिकेच्या प्रदर्शनात अवतरणार

महापालिकेच्या प्रदर्शनात अवतरणार

sakal_logo
By

राणीच्या बागेत अवतरणार कार्टून्सची दुनिया!
पाना-फुलांपासून बनलेल्या कलाकृती पाहण्याची बच्चे कंपनीला संधी

किरण कारंडे ः मुंबई
महापालिकेच्या उद्यान प्रदर्शनाचे यंदा २६ वे वर्ष आहे. दोन वर्षांच्या कोविड महामारीच्या खंडानंतर येत्या ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान अधिक उत्साहाने उद्यान विद्या प्रदर्शन भरणार आहे. राणीच्या बागेत होणाऱ्या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असेल ते म्हणजे पाना-फुलांपासून साकारण्यात येणारी कार्टून्स...

मुंबई महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात अर्थात राणीच्या बागेत लवकरच अनोख्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे. पाहुण्यांची नावे ऐकूनच अनेक लहानग्यांची पावले राणीच्या बागेकडे वळतील. मुलांची आवडती पेपा पिग फॅमिली, माशा ॲण्ड द बियर, ब्लुई, ट्विटी आणि सिल्व्हेस्टर यांच्यासह नानाविध कार्टून्स तिथे त्यांना पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे सर्व कार्टून्स रंगीबेरंगी पाना-फुलांपासून साकारण्यात येणार आहेत. त्यासाठी निमित्त ठरणार आहे ते ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित होणारे वार्षिक उद्यान प्रदर्शन! यंदाच्या प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण असणार आहे ते म्हणजे फुलांपासून साकारलेले ‘जी २०’चे बोधचिन्ह. त्याचबरोबर ‘जी २०’ सदस्य देशांमधील झाडे, फुले आणि भाज्या यांचा समावेशही यंदाच्या प्रदर्शनात असणार आहे, असे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
उद्यान प्रदर्शनाचे उद्‍घाटन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या हस्ते ३ फेब्रुवारी रोजी सकाळी होणार असून कार्यक्रमाला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना घेऊन पालिकेच्या उद्यान खात्याद्वारे आयोजित होणारे ‘वार्षिक उद्यान प्रदर्शन’ आता मुंबईची एक ओळख ठरू लागले आहे. लहान मुलांच्या भावविश्वाचा भाग असलेली कार्टून्स यंदा प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. त्याअंतर्गत पाना-फुलांपासून तयार करण्यात आलेल्या विविध कार्टून्सच्या प्रतिकृती यंदाच्या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. पाना-फुलांपासून तयार करण्यात आलेले अनेक ‘सेल्फी पॉइंट’ही यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहे. त्यासोबतच कुंड्यांमध्ये वाढवण्यात आलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय आदींचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना प्रदर्शनात पाहता येतील. मुंबई परिसरात अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या कृष्ण वडासारख्या अनेक दुर्मिळ देशी प्रजातींची झाडेही ‘याचि देही याचि डोळा’ पाहता येणार आहेत. यंदाच्या प्रदर्शनाचा शुभारंभ शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी होणार आहे. पहिल्या दिवशी दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत प्रदर्शन विनामूल्य पाहता येईल. ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते रात्री ८ अशी प्रदर्शनाची वेळ असेल.

‘जी २०’ देशातील रोपे अन् झाडेही आकर्षण
प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक परदेशी भाज्यांची रोपे आणि झाडे पाहण्याची संधीही मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. ‘जी २०’ सदस्य देशातील झाडे, भाज्या व फुलेही प्रदर्शनात बघावयास मिळणार आहेत. विक्री दालनांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे आणि बागकामविषयक पुस्तकांसारख्या अनेक बाबी खरेदी करण्याची संधीही मुंबईकरांना असणार आहे. नागरिकांसाठी उद्यान विद्याविषयक विविध कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येणार आहे, असे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी स्पष्ट केले.