
छायाचित्रांचे विद्रुपीकरण करणाऱ्यावर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने ९० फिट रोडवरील भिंतींवर छायाचित्र रेखाटण्यात आली आहेत. शहर सुशोभिकरण उपक्रमांतर्गत ही छायाचित्रे रेखाटण्यात आली आहेत; परंतु अज्ञात व्यक्तीने या चित्रांचे विद्रुपीकरण केले आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात पालिकेचे सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली नगरी स्वच्छ, सुंदर राहावी याकरिता पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत ९० फिट रोडवरील भिंतींवर विविध छायाचित्रे रेखाटण्यात आली आहेत. तसेच दुभाजकांची रंगरंगोटी, जीव्हीपी पॉईंट्चे निर्मूलन करण्यात आले आहे. असे असतानाही काही माथेफिरूंनी रंगवलेल्या दुभाजकांवर पानांची पिचकारी मारणे, रेखाटलेली सुंदर छायाचित्रे खराब करणे अशी कृत्य केली आहेत. याप्रकरणी जे प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.