
अहमदाबाद ते करमाळी दरम्यान विशेष गाड्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार अहमदाबाद ते करमाळीदरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकण मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०९४७० अहमदाबाद-करमाळी स्पेशल ट्रेन अहमदाबादहून २४ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी करमाळीला पहाटे ४.२५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०९४६९ करमाळी-अहमदाबाद विशेष २५ जानेवारी रोजी करमाळी येथून सकाळी ९.२० वाजता सुटेल आणि अहमदाबादला दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल. या दोन्ही ट्रेन वडोदरा, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकावर थांबणार आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण २१ जानेवारीपासून रेल्वेच्या सर्व केंद्रांवर आणि आयआरसीटीसी संकेस्थळावर सुरू होणार आहे.