
धूळखात पडलेल्या भंगार गाड्या उचला
अंबरनाथ, ता. २१ (बातमीदार) : अंबरनाथमधील मुख्य रस्त्यांप्रमाणेच अंतर्गत रस्त्यांवर वर्षानुवर्षे वापरात नसलेल्या आणि धूळखात पडलेल्या जुन्या गाड्या उचलाव्यात. तसेच, कचरा आणि पडलेले बांधकाम साहित्य उचलून नेऊन व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून अंबरनाथ शहर टेंपल सिटी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार शहरामध्ये साजेशी स्वच्छता राखण्याला महत्त्व देण्याची गरज चौधरी यांनी व्यक्त केली.
शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर अनेक वर्षांपासून जुन्या पासिंग संपलेल्या कार, टेम्पो, दुचाकी गाड्या रस्त्याच्या दुतर्फा पडलेल्या स्थितीमध्ये आहेत. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. रस्त्यावर उभी ठेवलेली आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी बेवारस वाहने हटवण्यासाठी नगरपालिका आणि आरटीओ यांनी संयुक्त मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी पालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात चौधरी यांनी नमूद केली आहे. पुढील महिन्यात महाशिवरात्र असल्याने संबंधित विभागांनी स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.