
पोलिसांच्या समर्थनार्थ गिरगावकर रस्त्यावर
मुंबादेवी, ता. २२ (बातमीदार) : गेल्या आठवड्यात चर्नी रोड स्थानकानजीक उभ्या असलेल्या अनधिकृत झोपडपट्टीवर लोकमान्य टिळक पोलिस ठाणे आणि महापालिका सी विभागाने कारवाई करून झोपडपट्टी निष्कासित केली. यावर एका सामाजिक कार्यकर्त्याने आक्षेप घेत पोलिसांना न्यायालयात खेचले होते. यानंतर गिरगावातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली व ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेतर्फे मुंबई पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली. ठाकूरद्वार नाक्यावर अनेक मंडळांचे कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी मुंबई पोलिसांना पाठिंबा दर्शविणारे फलक दाखवत पोलिसांच्या आणि पालिकेच्या कारवाईचे समर्थन केले.
एका सामाजिक कार्यकर्त्याने गिरगांवातील समस्येत नाक खुपसून बोलण्यापेक्षा विभागात अनधिकृत ढकलगाडीचा सुळसुळाट झालेल्या भाजी विक्री करणाऱ्या परप्रांतीयांवर कायमचा उपाय करण्याबाबत बोलावे. एमएमआरडीए प्रकल्पात बाधित झालेल्या मराठी कुटुंबीयांना त्यांची हक्काची घरे कधी आणि कुठे मिळतील, यावर बोलावे, अशा प्रकारची संतप्त प्रतिक्रिया या समर्थन आंदोलनाच्या आयोजक शिल्पा नायक आणि मिलिंद वेदपाठक यांनी दिली.
या वेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते समीर वेदक, साईदत्त क्रीडा मंडळ, नवदुर्गा मित्रमंडळ, अखिल मुगभाट मंडळ, गिरगावचा राजा, उरणकर वाडी मित्र मंडळासह अनेक गिरगावकर रस्त्यावर उतरले होते.