पतीचा पत्नीवर प्राणघातक हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतीचा पत्नीवर प्राणघातक हल्ला
पतीचा पत्नीवर प्राणघातक हल्ला

पतीचा पत्नीवर प्राणघातक हल्ला

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : पत्नी घटस्फोट देत नसल्याच्या रागातून पतीने लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उरणच्या मुळेखंड गावात घडली आहे. याप्रकरणी उरण पोलिसांनी भालचंद्र म्हात्रे (५२) याला अटक केली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरिता म्हात्रे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उरण तालुक्यातील मुळेखंड गावातील सरिता म्हात्रे (४७) पाच वर्षांपासून पतीपासून विभक्त होऊन एकट्याच राहत आहेत. त्यांचा पती भालचंद्र म्हात्रे हा त्या राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर वडिलांसोबत राहत आहे. भालचंद्र म्हात्रे याचे परस्त्रीशी संबंध असल्याने सरिता म्हात्रे यांनी त्याला विरोध केला होता. तेव्हापासून भालचंद्र म्हात्रे याने सरिता यांच्याकडे घटस्फोटाची मागणी सुरू केली होती. तीन वर्षांपूर्वी सरिता म्हात्रे यांना तशी नोटीस सुद्धा पाठवली होती. मात्र, सरिता म्हात्रे यांनी घटस्फोट देण्यास नकार दिला होता. याच कारणावरून संतापलेल्या भालचंद्र म्हात्रे याने सरिता म्हात्रे यांच्याकडे तत्काळ घटस्फोटासाठी तगादा लावत शिवीगाळ करून घरातून निघून जाण्यास सांगितले. याच कारणावरून दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर भालचंद्र म्हात्रे याने सरिता म्हात्रेच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात सरिता म्हात्रे यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी भावाला देऊन रुग्णालय गाठले. तसेच उरण पोलिस ठाण्यातदेखील तक्रार दाखल केली. त्यानुसार भालचंद्र म्हात्रे याला प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली आहे.