
अलिबाग चित्रकला
विद्यार्थ्यांनी लुटला चित्रातून आनंद
अलिबाग, ता. २२ (बातमीदार) ः मोबाईलच्या जगतामध्ये वावरणाऱ्या आजच्या पिढीतील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे रविवारी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सृजन माध्यमिक विद्यालयातील केंद्रामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. पहिली ते दहावीपर्यंतच्या शेकडो विद्यार्थ्यांकडून स्पर्धेला उत्स्फूर्त सहभाग घेत चित्रांतून कलाविष्कार सादर केला.
अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना नवनवीन शिकण्याची आवड कायमच असते. दैनिक ‘सकाळ’तर्फे अनेक वर्षांपासून हा उपक्रम हाती घेण्यात आला आह. कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर रविवारी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. पहिली ते दुसरी ‘अ’ गट, तिसरी ते चौथी ‘ब’, पाचवी ते सातवी ‘क’, आठवी ते दहावी ‘ड’ अशा चार गटात स्पर्धा घेण्यात आली होती. वाढ दिवसाचा केक, माझे आवडते कार्टूनमधील पात्र, मास्क आणि मी, प्राणी संग्रहालय, ऑनलाईन शाळा, फिश टँकमधील मासे, बागेतील दृश्य, घरातील स्वच्छता कामगार, मी लस घेतली हे दाखवणारा मुलगा, किंवा, मिरवणुकीसाठी सजवलेला घोडा, क्रिकेटचा सामना, बँकेत मास्क परिधान केलेले लोक, पाण्याखालची जीवसृष्टी, गायींचा गोठा किंवा गो शाळा, कोरोना योद्धे, अपघात, बाजारपेठेत मास्क घालून खरेदी करणारे लोक अशा वेगवेगळ्या विषयांवर स्पर्धा घेण्यात आली.
सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सृजन माध्यमिक विद्यालयासह शाळेतील साहायक शिक्षक प्रणय पाटील, साहायक शिक्षिका सुषमा पाटील, शिपाई सुहास मनोरे, विकास पाटील यांनी सहकार्य केले. शाळेतील वातावरण प्रफुल्लित असल्याने सहभाग विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटला.
दैनिक सकाळचा चित्रकला स्पर्धेचा उपक्रम खूप चांगला आहे. आम्ही विद्यार्थी दरवर्षी स्पर्धेची वाट पाहात असतो. चित्र रेखाटताना एक वेगळा आनंद मिळतो. तसेच यातून काहीतरी नवीन शिकायला मिळते.
- लव्या राकेश घाडगे, विद्यार्थिनी